मागील अनेक दशकांपासून भारतीय क्रिकेट हे यशाच्या शिखरावर आहे. मागील जवळजवळ 30 ते 40 वर्षात विविध टप्प्यावर भारतीय संघाला अनेक उत्तम खेळाडू भेटत गेले , ज्यामुळे भारतीय संघ यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. 1980 चा विचार केला असता सुनील गावस्कर व कपिल देव भारतासाठी धावा बनवत होते. 90 च्या दशकात अझरुद्दीन व सचिन तेंडुलकर यांनी भारताचे नाव मोठे केले.
2001 ते 2010 पर्यंत सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण व राहुल द्रविड यांनी संपूर्ण क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, तसेच 2011 ते 2020 दरम्यान महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व रोहित शर्मा यांनी संपूर्ण क्रिकेट विश्वात आपला डंका वाजवला. भारतीय क्रिकेट रसिकांना आशा असेल की ,येणाऱ्या काळातही अशाच प्रकारचे उत्तम भारतीय खेळाडू तयार होतील. आपण या लेखात बघणार आहोत असे टॉप 5 भारतीय खेळाडू जे 2021 ते 2030 मध्ये धावांचा डोंगर उभारू शकतात.
1) शुभमन गिल –
पंजाब कडून खेळणाऱ्या शुभमन गिलने स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. शुभमने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या 24 सामन्यात तब्बल 69 च्या सरासरीने 2350 धावा केल्या आहेत. शुभमनने यादरम्यान 7 शतके व 11 अर्धशतके देखील झळकावली आहेत. नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमनला पदार्पणाची संधी मिळाली व त्याने दोन्ही डावात उत्तम कामगिरी करत आपण भविष्यातील स्टार आहोत हे स्पष्ट केले.
2) पृथ्वी शॉ –
भारतीय क्रिकेटमधील दुसरा वीरेंद्र सेहवाग म्हणून ओळखला जाणारा पृथ्वी शॉ आगामी काळात निश्चितच मोठा स्टार असेल यात शंकाच नाही. सध्या पृथ्वी चा फॉर्म तितकासा चांगला नाही मात्र त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल कुठलीही शंका घेता येणार नाही. पृथ्वीने आतापर्यंत खेळलेल्या 5 कसोटी सामन्यात 42 च्या सरासरीने 1 शतक आणि 2 अर्धशतक झळकावले आहेत. पृथ्वी मागील बऱ्याच वर्षांपासून प्रथम श्रेणी सामन्यात धावांचा पाऊस पडतो आहे, व येणाऱ्या दशकातही तो भारतीय संघाकडून उत्तम कामगिरी करेल अशी सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा असेल.
३) मयंक अग्रवाल –
पृथ्वीप्रमाणेच मयंक देखील सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मात्र त्याच्या क्रिकेट क्षमतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मयंकने नुकतेच भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. मयंक ने आतापर्यंत खेळलेल्या 13 कसोटी सामन्यात 47 च्या सरासरीने 1005 धावा केल्या आहेत. यादरम्यान मयंकने 3 शतक व 4 अर्धशतक झळकावले आहेत. भविष्यातही मयंककडून भारतीय संघाला अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.
4) इशान किशन –
झारखंडच्या या स्टार खेळाडूला अजून पर्यंत भारतीय संघात संधी मिळाली नाही, मात्र प्रथम श्रेणी सामन्यात व आयपीएल मध्ये इशानने आपल्या फलंदाजीचे कौशल्य संपूर्ण क्रिकेट विश्वाला दाखवले आहे. 2014 मध्ये आपल्या देशांतर्गत क्रिकेट करियरला सुरुवात करणाऱ्या इशानने आतापर्यंत 44 फर्स्ट-क्लास, 72 लिस्ट-ए आणि 90 टी20 सामने खेळलेले आहेत. यात इशानने फर्स्ट-क्लास मध्ये 2665 , लिस्ट-ए मध्ये 2334 आणि टी20 मध्ये 2230 रन बनवले आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यात देखील इशान याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी आशा सर्वांना आहे.
5) यशस्वी जयस्वाल –
भारताच्या U 19 क्रिकेटमधील स्टार यशस्वीने आपल्या क्रिकेट कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. 13 लिस्ट-ए सामन्यात यशस्वीने 70 च्या अविश्वसनीय सरासरीने 779 रन बनवले आहेत. यादरम्यान त्याने 3 शतक व 3 अर्धशतक देखील झळकावले आहेत. यशस्वीकडे बघून निश्चितच भविष्यातील स्टार खेळाडू ची झलक बघायला मिळते. यशस्वी देखील सर्वांच्या अपेक्षांना पूर्ण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवेल, अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
100% फिट नसुनही ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळणार तिसरा सामना, कोचने सांगितले कारण
रहाणेच्या नेतृत्त्वाची माजी महिला क्रिकेटरला पडली भुरळ; म्हणाली, “हे काम फक्त तोच करू शकतो”
धक्कादायक! इंग्लंडच्या ‘या’ दोन माजी अंपायरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर केला वर्णभेदाचा आरोप