संपुर्ण नाव- गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ
जन्मतारिख- 12 फेब्रुवारी, 1949
जन्मस्थळ- भद्रावती, म्हैसूर
मुख्य संघ- भारत, कर्नाटक आणि म्हैसूर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- लेगब्रेक
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर, 1969
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 91, धावा- 6080, शतके- 14
गोलंदाजी- सामने- 91, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/11
आंतरराष्ट्रीय वनडे सामने– 25, धावा- 439, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-‘विशी’ या टोपणनावाने ओळखले जाणारे गुंडप्पा विश्वनाथ हे भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे मेहूणे (बहिणीचा पती) आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव कविता असे आहे.
-गावसकर यांनी त्यांचा मुलगा रोहन गावसकर याचे नाव ‘रोहन जयविश्वा’ असे ठेवले होते. हे नाव गावसकर यांनी त्यांच्या 3 आवडत्या क्रिकेटपटूंच्या नावावरून ठेवले होते – वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार रोहन कान्हई (Rohan Kanhai), भारतीय माजी अष्टपैलू क्रिकेटपटू एम.एल. जयसिम्हा (M.L Jaisimha) आणि विश्वनाथ.
-विश्वनाथ लहानपणी त्यांचा भाऊ जगन्नाथ आणि शेजारी एस. कृष्णा यांच्याकडून क्रिकेट खेळायला शिकले. हे दोघेही चांगले क्लब खेळाडू होते. त्यांचे भाऊ ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे चाहते होते. ते ऑस्ट्रेलिया क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकण्यासाठी विश्वनाथ यांना सकाळी लवकर उठवत असत. विश्वनाथ हे सुरुवातीला क्रिकेट खेळताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नील हार्वे यांचे अनुकरण करत असत.
-सत्तरच्या दशकात विश्वनाथ हे त्यांच्या अनोख्या फलंदाजी शैलीसाठी प्रसिद्ध होते. ते फलंदाजी करताना मनगटाचा अधिक वापर करत शॉट्स(Wrists shots) मारायचे. यासह ते वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू गोलंदाजांविरुद्ध खेळण्यातही सराईत होते.
– विश्वनाथ हे मनगटाचा सर्वाधिक वापर करुन फलंदाजी करण्यात (wristy batting) पारंगत होते. त्यावेळी त्यांच्या व्यतिरिक्त अशा फलंदाजी शैलीचा वापर केवळ मोहम्मद अझिरुद्दीन (Mohammad Azharuddin) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी केला आहे.
-साठच्या दशकात विश्वनाथ यांनी रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. त्यावेळी 1967मध्ये पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला होता.
-त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1969च्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. कानपुर येथे झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी पहिल्याच डावात शून्य धावा केल्या होत्या. मात्र, याच सामन्याच्या दुसऱ्या डावात विश्वनाथ यांनी सर्वाधिक 137 धावा करण्याचा पराक्रम केला होता. यात 25 चौकारांचा समावेश होता.
-यामुळे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शून्य आणि शतक करण्याचा विक्रम करणारे विश्वनाथ हे पहिलेच भारतीय क्रिकेटपटू ठरले होते. त्यांच्यानंतर असा विक्रम केवळ दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू अँन्ड्र्यू हडसन (Andrew Hudson) आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोहम्मद वासिम (Mohammad Wasim) यानांच करता आला.
-विश्वनाथ यांच्याबाबतीतील एक योगायोगाची गोष्ट सांगायची तर ती अशी की, त्यांनी ज्याही कसोटी सामन्यात शतकी खेळी केली तो प्रत्येक सामना भारताने जिंकला. त्यांनी एकूण 13 सामन्यात शतके केली होती आणि ते तेराही सामने भारताने जिंकले होते.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विश्वनाथ यांनी 1999 ते 2004 पर्यंत आयसीसी सामनाधिकारी म्हणून काम केले आहे. ते बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्षही होते. तसेच भारतीय संघाचे व्यवस्थापकही होते.
-याबरोबरच विश्वनाथ यांना 2009मध्ये बीसीसीआयतर्फे कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारही (Col. C K Naidu Lifetime Achievement Award) देण्यात आला होता. हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे.