दक्षिण आफ्रिकन संघ सध्या वेस्ट इंडिज दौर्यावर असून उभय संघ या दरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला काल (११ जून) पासून सेंट लुसियाच्या डॅरेन सॅमी मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा खुर्दा उडवत अवघ्या ९७ धावांवर त्यांना सर्वबाद केले होते.
गोलंदाजांनी हा पहिला दिवस गाजवल्यानंतर दुसरा दिवस दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या नावे झाला. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेच्या डावात नाबाद शतकी खेळी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. सहाव्या क्रमांकावर येत त्याने झळकावलेल्या नाबाद शतकामुळे पाहुणा संघ पहिल्या कसोटी मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
क्विंटन डी कॉकची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी
वेस्ट इंडिज विरुद्ध दुसर्या डावात फलंदाजी करत असतांना दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ११९ अशी अवस्था असतांना डी कॉक फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर त्याने सूत्र आपल्या हाती घेत वेस्ट इंडिज गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. दुसर्या बाजूने फलंदाज बाद होत असले तरी त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी सुरू ठेवली. या डावात त्याने १७० चेंडूत १४१ धावांची आक्रमक खेळी साकारली. यात १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याच्या कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. इतकंच नाही तर त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम खेळी ठरली.
या डावात डी कॉकने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत केलेल्या फटकेबाजीने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात ३२२ धावांची मजल मारली. डी कॉक व्यतिरिक्त आफ्रिकेकडून एडिन मार्करमने ६० तर रासी वॅन डर डुसेनने ४६ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने ७५ धावा देऊन ४ बळी घेतले. तर तर आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या जेडन सील्सने ७५ धावा देत ३ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत
दरम्यान, वेस्ट इंडिज संघ पहिल्या डावात ९७ धावांवर सर्वबाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेला २२५ धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. त्यातच दुसर्या डावात फलंदाजी करतांना दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान वेस्ट इंडिजची ४ बाद ८२ अशी नाजूक अवस्था झाली असून ते अजूनही १४३ धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर आपली पकड मजबूत केली असून तिसर्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव लवकर गुंडाळत विजय मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
अरे बापरे! श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघ राहणार तब्बल इतके दिवस क्वारंटाईन
Video: विजेच्या वेगाने आलेला चेंडू ‘या’ इंग्लिश क्षेत्ररक्षकाने टिपत संपवली कॉनवेची अप्रतिम खेळी
खुद्द शार्दुलचे प्रशिक्षक म्हणाले, ‘कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात त्याला तेव्हाच खेळवा, जेव्हा…’