भारतीय क्रिकेटपटू सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान भारतीय फिरकीपटू साई किशोर याने मोठा दावा केला आहे. तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोर स्वत:ला देशातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मानतो. संघ निवडकर्त्यांनी त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची एक संधी द्यावी, असे त्याचे म्हणणे आहे.
मार्च 2024 मध्ये रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात तमिळनाडू संघाचे नेतृत्व केल्यानंतर साई किशोर आयपीएल 2024 मध्ये खेळला. परंतु स्पर्धेच्या मध्यभागी त्याच्या मानेला दुखापत झाली आणि तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र, दुखापतीमुळे त्याचे धैर्य कमी झाले नाही. तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला. यानंतर त्याला क्रिकेटमधून थोडी विश्रांती मिळाली आणि सुट्टीच्या या काळात त्याने प्रशिक्षण घेतले.
‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना साई किशोर म्हणाला, “मला खूप आत्मविश्वास वाटतो आहे, कारण मी याआधी कधीही अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. कदाचित आयपीएलमध्ये येण्यापूर्वी मी असे प्रशिक्षण घेत होतो. पहाटे 4 वाजता उठायचे, सरावाला जायचे आणि नंतर गोलंदाजी करायची. मी गेल्या चार-पाच वर्षात इतके तास घालवले नाहीत, जितके मी यंदाच्या प्री-सीजनमध्ये घालवले. आयपीएलदरम्यान कुणालाही वेळ मिळत नाही. सर्वजण आपल्या रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करतात. परंतु तमिळनाडू प्रीमियर लीगनंतर मला 15-20 दिवसांची विश्रांती मिळाली आणि मी त्याचा उत्तम उपयोग केला.”
साई किशोर बुची बाबू स्पर्धेत टीएनसीए इलेव्हनचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल चहर या खेळाडूंसोबत खेळणार आहे. याबाबत पुढे बोलताना तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला साई किशोर म्हणाला, “मला वाटते की मी देशातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. मला कसोटी सामन्यात उतरवा, मी तयार आहे. त्यामुळे, मला फारशी चिंता नाही. कसोटी संघात जडेजा आहे. पण मी त्याच्यासाठी तयार आहे. मी जडेजासोबत कधी खेळलो नाही. पण सीएसकेमध्ये त्याच्यासोबत राहिलो आहे. तो जे करतो त्या दृष्टीने हा एक चांगला शिकण्याचा अनुभव असेल, मला आत्मविश्वास वाटतो. त्यामुळे मी नेहमीपेक्षा जास्त तयार आहे.”
पुढे साई किशोर म्हणाला, “बुची बाबू स्पर्धेत खेळण्याचे मुख्य कारण म्हणजे 50 षटके टाकण्यासाठी सज्ज होणे. मला बुची बाबू स्पर्धा खेळायची होती. मला जास्तीत जास्त क्रिकेट खेळायचे आहे. कधीकधी अशा दुखापती वरदान ठरू शकतात, कारण कधी कधी क्रिकेटपटूंना खूप क्रिकेट खेळण्याचा कंटाळा येतो, हे माझ्या बाबतीत फारसे घडत नाही, परंतु दुखापत झाल्यास असे बहुतेकांसोबत घडते. जर मला 50 षटके टाकायची संधी मिळाली तर मी ते अधिक आवडीने आणि उत्साहाने करेन.”
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘काला चष्मा’ गाण्यावर 2 ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या मनू भाकरचा भन्नाट डान्स
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू