‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) बऱ्याच नवोदित शिलेदारांना कारकिर्द घडवण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. केवळ नवख्या क्रिकेटपटूंची नव्हे तर कित्येक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचीही कारकिर्द आयपीएलमुळे बहरली आहे. त्यातही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंना वेगळीच ओळख मिळाली आहे.
एक-दोन नव्हे तर विक्रमतोड ५ वेळा आयपीएल जेतेपद भूषवणारा हा संघ इथवर पोहोचण्यात संघातील खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. यातील एक खेळाडू म्हणजे, २२ वर्षीय गोलंदाज ‘राहुल चाहर’.
मुंबई इंडियन्सच्या या लेग स्पिनरला कौटुंबिक क्रिकेट वारसा लाभला. त्याचा मोठा चुलत भाऊ दिपक चाहर याने आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत राहुलनेही क्रिकेट क्षेत्र निवडले आणि आयपीएल व भारतीय संघात जागाही मिळवली.
आयपीएल २०१७ मध्ये पुणे सुपरजायंट्स संघाकडून राहुलने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. पदार्पणाच्या हंगामात त्याला केवळ ३ सामने खेळायला मिळाले. त्यातही त्याने फक्त २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापुढील हंगामात त्याला कुणीही वाली मिळाला नाही. त्यामुळे आयपीएल २०१८ मध्ये तो खेळताना दिसला नाही. अखेर २०१९ साली रोहित शर्माच्या मुंबई संघाची त्याच्यावर नजर पडली. त्यांनी १.९ कोटींना राहुलला आपल्या ताफ्यात सहभागी केली आणि त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले.
मुंबईचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने २ हंगामात २८ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे. याच कामगिरीने प्रकाशझोतात आलेल्या राहुलला ऑगस्ट २०१९ मध्ये वेस्ट इंडिविरुद्ध भारतीय टी२० संघात पदार्पणाची संधी मिळाली.
इमरान ताहिरकडून घेतो टिप्स
राहुल ऑस्ट्रेलियाचे दिग्गज शेन वॉर्न यांना आपला आदर्श मानतो. आपल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामात पुणे संघाकडून खेळताना इमरान ताहिरचे मार्गदर्शन लाभले. तो राहुलला नेहमी गोलंदाजीबद्दल टिप्स देत असे. १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळतानाही ताहिरने राहुलला भरपूर मदत केली होती.
हाच राहुल आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आपल्या दमदार गोलंदाजीची चुणूक दाखवत मुंबई इंडियन्सला विजयाची हॅट्रिक घेण्यात मोलाचा वाटा उचलू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
मी अजिबात या गोष्टींचा त्रागा करुन घेत नाही; सातत्याने दुर्लक्षित होत असलेल्या कुलदीपचं मोठ विधान
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू