भारतीय संघाला विश्वचषक 2023 स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशात स्पर्धेचा 37वा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने पंड्याची दुखापत आणि संघातील गोलंदाजांविषयी मोठे विधान केले आहे. तसेच, संघाच्या संयोजनाबाबतही मोकळेपणाने चर्चा केली आहे. त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये सहावा गोलंदाजाच्या पर्यायाविषयीही भाष्य केले.
‘संघ शानदार खेळत आहे’
राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाला की, “आमच्या संघाने 7 सामन्यात शानदार प्रदर्शन केले आहे आणि आता सामना अशा संघासोबत आहे, जो खूपच चांगला खेळत आहे. लोक काय म्हणत आहेत, त्याची आम्हाला चिंता नाहीये. आम्ही पुढील सामन्यावर लक्ष देतो आणि हा एक साखळी सामना आहे. अहमदाबादमधील अंतिम सामन्याविषयी आम्ही आताच विचार करत नाहीयेत. कारण, तिथे पोहोचण्यापूर्वी आम्हाला 3 सामने खेळायचे आहेत.”
प्रसिद्ध कृष्णाच्या निवडीवर भाष्य
अष्टपैलू हार्दिक पंड्या हा बाहेर पडताच त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याला निवडण्याविषयी द्रविडला प्रश्न करण्यात आला. यावेळी तो म्हणाला की, “हार्दिकने विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळले नव्हते. आम्ही तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसोबत खेळत आहोत. राखीव खेळाडूंमध्ये फिरकी, फलंदाजी, गोलंदाजी अष्टपैलू यांचे पर्याय होते आणि आम्हाला माहिती होते की, कोणत्या खेळाडूचा काय पर्याय असेल. आम्ही अलीकडेच याचे संयोजन आजमावले आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला.”
‘सहाव्या तज्ज्ञ गोलंदाजाची उणीव भासत नाही’
द्रविडने असेही म्हटले की, भारतीय संघाला सहाव्या तज्ज्ञ गोलंदाजाची उणीव भासत नाहीये. तो म्हणाला, “हार्दिक सहाव्या गोलंदाजाचा पर्याय देतो, पण मागील चार सामने त्याच्याशिवाय खेळलो आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली आणि इंदोरमध्ये सहाव्या गोलंदाजाशिवाय जिंकलो होतो. या आव्हानाचा चांगल्याप्रकारे सामना केला आहे.”
विराटला मजेत म्हटले ‘खतरनाक गोलंदाज’
द्रविडने मजेशीर अंदाजात म्हटले की, “आमच्याकडे एक खतरनाक इनस्विंग गोलंदाजही (विराट कोहली) आहे. प्रेक्षक मागील सामन्यात त्याला गोलंदाजी देण्याची मागणी करत होते. सूर्यकुमारही गोलंदाजी करू शकतो आणि गरज पडली, तर रोहितसुद्धा.”
अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याला गोलंदाजी करण्याची संधी मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या सामन्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. (rahul dravid jokes about using wrong footed in swinging menace virat kohli as sixth bowling option india vs south africa cwc 2023)
हेही वाचा-
विजयानंतर गगनात मावेना कमिन्सचा आनंद, पण व्यक्त केली ‘या’ गोष्टीची चिंता, म्हणाला, ‘आताही वाटतंय की…’
‘सर्व माझ्यामुळेच झालं…’, सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडताच तुटलं बटलरचं काळीज, चूकही टाकली सांगून