इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पंधराव्या हंगामानंतर भारतीय चाहते आता आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटसाठी उत्सुक आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर आला आहे. यावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना ९ जूनला दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
या मालिकेत अनेक भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान निर्माण केले आहे. यावेळी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हे संघात पुनरागमन करणार आहेत. तर उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदिप सिंग या नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
उमरान आयपीएल २०२२मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळला. त्याने १४ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या असून तो हैद्राबादकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. ताशी १५७ पेक्षा अधिक वेगवान गतीने गोलंदाजी करत त्याने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. याच कामगिरीमुळे निवड अधिकाऱ्यांनी त्याला संघात घेतले आहे. मात्र, अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळणार का नाही हे निश्चित नाही.
उमरानच्या कामगिरीबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “त्याला अधिक वेळ द्यावा लागेल जेणेकरून आम्हाला त्याच्या कामगिरीचा अंदाज येईल. आमच्याकडे खेळाडूंची संख्या अधिक आहे. पण सगळ्यांनाच अंतिम अकरामध्ये स्थान नाही देता येत.”
“खेळाडूंना वेळ देण्यावर मी भर देतो. अर्शदिपही एक चांगला खेळाडू आहे. तसेच संघात भूवी, हर्षल आणि आवेश असे अनुभवी खेळाडू आहेत, जे मागील मालिकेत खेळले होते. युवा खेळाडू संघात असणे ही एक चांगली बाब आहे. आता ते कशी कामगिरी करतात यावर लक्ष असेल,” असेही द्रविड पुढे म्हणाले आहेत.
उमरानच्या गोलंदाजी वेगाबाबत बोलताना द्रविड म्हणाले, “आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाजाचा वेग पाहून आनंद झाला. त्याला अधिक संधी दिल्या तर त्याची गोलंदाजी अजून चांगली होईल. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली तर त्याने अप्रतिम कामगिरी करावी.”
दोन आयपीएल हंगाम खेळणाऱ्या उमरानने १७ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला आयपीएल २०२२चा उद्योन्मुख खेळाडू हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळण्याची राहुलची ही पहिलीच वेळ असणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्रविडसह पंत, श्रेयस, केएल अन्य भारतीय संघापेक्षा ३ दिवस उशीरा जाणार इंग्लंडला; ‘हे’ आहे कारण
पुरुष नाही महिला क्रिकेटपटूंनी रचला होता इतिहास, वनडे सामन्यात ठोकलेल्या ४९१ धावा
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून