भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२४ जुलै) त्रिनिदादमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्याप्रमाणे हा सामना देखील रोमांचक ठरला. मात्र, भारतीय संघाने अखेरच्या षटकात दोन गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या वनडे सामन्याचा नायक अष्टपैलू अक्षर पटेल ठरला. त्याने आधी किफायतशीर गोलंदाजी केली. तसेच संघ अडचणीत असताना अवघ्या ३५ चेंडूत नाबाद ६४ धावांची नाबाद खेळी केली. यावेळी पटेलच्या बॅटमधून तीन चौकार आणि पाच उत्तुंग षटकार आले. या सुरेख खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
या सामन्यात प्रेक्षक तसेच संपूर्ण भारतीय डग आऊटही प्रचंड चिंतेत होता असा खुलासा उपकर्णधर श्रेयस अय्यर याने केला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रेयस म्हणाला,
“हा सामना रोमांचक होता. खरे सांगायचे तर आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि राहुल सर खूप अस्वस्थ झाले होते. मैदानातील खेळाडूंना ते सतत संदेश देत होते. मला वाटते की, सर्व खेळाडूंनी खरोखर चांगले धैर्य दाखवले आणि दबावाच्या परिस्थितीत ते खूप शांत राहिले. आम्ही अलीकडे बरेच सामने खेळलो आहोत. अशी परिस्थिती आम्ही यापूर्वी देखील पाहिली आहे. आजच्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली. विशेषतः अक्षरने सामना ज्या प्रकारे संपवला ते कौतुकास्पद आहे.”
स्वतः श्रेयस अय्यरनेही या सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. पहिल्या दोन सामन्यासाठी रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत तो संघाचे उपकर्णधारपद भूषवत होता.
या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे. आता मालिकेतील अखेरचा सामना २७ जुलै रोजी खेळवण्यात येईल. त्यानंतर उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा संघात पुनरागमन करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी