---Advertisement---

खेळाडू, कर्णधार म्हणूनच नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही पहिल्या वनडेत द्रविडच्या पारड्यात विजयच

On: रविवार, जुलै 18, 2021 11:59 PM
---Advertisement---

कोलंबो। भारतीय संघाने रविवारी (१८ जुलै) श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना ७ विकेट्सने जिंकला आणि ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यामुळे भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या बाबतीत एक खास योगायोग पाहायला मिळाला आहे.

राहुल द्रविडबाबत खास योगायोग 
भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. याचवेळी भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे भारताचे नियमित प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री कसोटी संघासह इंग्लंडमध्ये आहेत. याच कारणामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे.

द्रविडच्या प्रशिक्षणाखाली रविवारी श्रीलंकेविरुद्ध भारताच्या वरिष्ठ संघाने खेळलेला पहिलाच वनडे सामना ठरला आहे. त्यामुळे द्रविड हा असा क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीतील खेळाडू म्हणून, कर्णधार म्हणून आणि आता प्रशिक्षक म्हणून पहिला वनडे सामना जिंकला आहे.

द्रविडने ३ एप्रिल १९९६ रोजी सिंगापूर येथे श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. तो सामना भारताने १२ धावांनी जिंकला होता.  त्यानंतर द्रविडने त्याच्या कारकिर्दीत १४ डिसेंबर २००० रोजी कर्णधार म्हणून पहिला वनडे सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळला होता. हा सामना भारताने ३९ धावांनी जिंकला होता. त्यानंतर आता द्रविडने वरिष्ठ भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणूनही पहिला वनडे सामना जिंकला आहे.

द्रविडला प्रशिक्षणाचा आहे अनुभव
द्रविडने भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यापूर्वी भारत अ संघाचे आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकही जिंकला होता.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत विजय 
श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६२ धावा केल्या. त्यांच्याकडून चमिका करुणारत्नेने  १ चौकार आणि २ षटकारांसह ३५ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या. तसेच भारताकडून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रतिउत्तरादाखल भारताकडून इशान किशनने ५९ धावांची आणि शिखर धवनने नाबाद ८६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर पृथ्वी शॉने ४३ धावा केल्या. त्यामुळे भारताने हा सामना ३६.४ षटकात २६३ धावा पूर्ण करत सहज जिंकला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० पाठोपाठ वनडे पदार्पणातही इशान किशनचे अर्धशतक; ‘या’ विश्वविक्रमाच्या यादीत मिळवले स्थान

वाढदिवशी ‘अशी’ अद्वितीय कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज बनला इशान किशन

पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत इशानने केला मोठा प्रताप, ‘अशी’ कामगिरी करणारा बनला जगातील पाचवा फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---