पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत पंधराव्या दिवशी सिद्धेश वीर(नाबाद ९८धावा) व विशांत मोरे(नाबाद ३७) यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा ५ गडी राखून पराभव करून चौथा विजय नोंदवला. `
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचं निर्णय घेतला. पुणेरी बाप्पा संघाने आज आपल्या सलामी जोडीत बदल केला आणि तो यशस्वी ठरला. रामकृष्ण घोष व पवन शहा या सलामीच्या जोडीने २८ चेंडूत ४५भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. रामकृष्ण घोषने ३३चेंडूत ५२धावांची सलामी दिली. त्यात त्याने ३चौकार व ४ षटकार खेचले. पवन शहा चोरटी धाव घेत असताना १६धावांवर बाद झाला. त्यानंतर रामकृष्णने यश क्षीरसागर(१८धावा) च्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ३२ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने २०चेंडूत १चौकार व ४षटकाराच्या मदतीने ३६धावांची सुरेख खेळी केली. ऋतुराज व अभिमन्यू जाधव(१३)धावा)यांनी सहाव्या विकेटसाठी ३१चेंडूत ४५ धावांची भागीदारी करून संघाला १६७धावांचे आव्हान उभे करून दिले.
१६७ धावांचे आव्हान रायगड रॉयल्स संघाने १९. १षटकात ५बाद १६८धावा करून पूर्ण केले. सलामवीर यश नाहर खाते न उघडताच तंबूत परतला. पाठोपाठ रोहन मारवाह(१)देखील विवेक शेलारच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला. एकाबाजूने विकेट पडत असताना सलामवीर सिद्धेश वीरने संयमी खेळी केली. सिद्धेशने ३९चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. सिद्धेशने नौशाद शेखच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ४९चेंडूत ५७धावांची भागीदारी केली. नौशाद शेख आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात २६धावांवर बाद झाला. रायगड रॉयल्स संघ ११.२ षटकात ५बाद ७७असा अडचणीत होता. रायगड संघाला विजयासाठी ५१चेंडूत ९१धावांची आवश्यकता होता. सिद्धेशने आपली चमकदार खेळी सुरु ठेवत संघाचे हे लक्ष्य पपूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने ५५चेंडूत नाबाद ९८धावांची खेळी केली. सिद्धेशचे शतक दोन धावांनी हुकले. त्यात त्याने १०चौकार व ५षटकारांची आतषबाजी केली. त्याला विशांत मोरेने २२चेंडूत ४चौकार व १षटकारासह नाबाद ३७धावा काढून साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ४७चेंडूत ९१धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
४एस पुणेरी बाप्पा: २०षटकात ८बाद १६७धावा(रामकृष्ण घोष ५२(३३,३x३,४x६), ऋतुराज गायकवाड ३६(२०,१x४,४x६), यश क्षीरसागर १८, पवन शहा १६, अभिमन्यू जाधव १३, सचिन भोसले नाबाद १३, सुनील यादव ३-२६, तनय संघवी २-३३) पराभुत वि.रायगड रॉयल्स: १९.१ षटकात ५बाद १६८धावा(सिद्धेश वीर नाबाद ९८(५५,१०x४,५x६), विशांत मोरे नाबाद ३७(२२,४x४,१x६), नौशाद शेख २६, रोशन वाघसरे २-२१, यश क्षीरसागर १-१८, रामकृष्ण घोष १-४१); सामनावीर – सिद्धेश वीर.