आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळला गेला. राजस्थानने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईवर वर्चस्व गाजवले. अखेर एकतर्फी झालेल्या या सामन्यात यजमान राजस्थानने 32 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पहिल्या स्थानी मुसंडी मारली. नजीकच्या काळात राजस्थान चेन्नईला वरचढच ठरत असल्याची आकडेवारी समोर येत आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने आधी फलंदाजी व त्यानंतर गोलंदाजीत आपली सर्वोत्तम कामगिरी केली. त्यासह हंगामातील दुसऱ्याही सामन्यात चेन्नईला राजस्थानला पराभूत करता आले नाही. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या हंगामातील यापूर्वीच्या सामन्यात राजस्थानने तीन धावांनी विजय मिळवला होता.
राजस्थान व चेन्नई यांच्या दरम्यान आतापर्यंत 28 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 14 सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला असून, राजस्थानने 13 सामने आपल्या नावे केले. एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. मागील सात सामन्यांचा विचार केल्यास, तब्बल सहा सामने राजस्थानने आपल्या खिशात घातलेत. चेन्नईने राजस्थानला अखेरच्या वेळी 2021 मध्ये पराभूत केले होते. त्यामुळे आता राजस्थान विरुद्ध चेन्नई ही जुनी रायवलरी पुन्हा एकदा नव्याने रंगू लागली आहे.
राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याचा विचार केला गेल्यास राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानसाठी यशस्वी जयस्वालने 77 धावांची सर्वाधिक खेळी केली. ध्रुव जुरेल व देवदत्त पडिक्कलने आक्रमक फटकेबाजी करत संघाला 200 धावांपर्यंत मजल मारून दिली. या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला राजस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. त्यानंतर फिरकीपटूंनी बळी मिळवत चेन्नईला सामन्यातून बाहेर केले. डेथ ओवर्समध्ये पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांनी आपले कसब दाखवत 32 धावांनी मोठा विजय साकार केला.
(Rajasthan Royals Dominate Chennai Super Kings Since 2020 In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“रोहित मानसिकदृष्ट्या थकलाय”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली हिटमॅनची परिस्थिती
रॉयल्सचा किल्ला भेदण्यात सीएसके पुन्हा अपयशी! शानदार विजयासह राजस्थान पुन्हा नंबर वन