आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण, राजस्थान रॉयल्सचे संकट काही कमी होताना दिसत नाही. जोस बटलरच्या जागी संघात सामील झालेला वेस्ट इंडिजचा फलंदाज एविन लुईसही जखमी झाला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात त्याला दुखापत झाली आहे.
लुईस लीगमध्ये सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाकडून खेळत होता. सेंट लुसियाविरुद्ध अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना, चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.
सेंट लुसियाच्या डावाच्या पाचव्या षटकात ही घटना घडली. डॉमिनिक ड्रेक्स हे षटक टाकत होता आणि रहकीम कॉर्नवाल स्ट्राईकवर होता. कॉर्नवॉलने ड्रेक्सचा एक चेंडू कट केला आणि बॅकवर्ड पॉईंटवर उभ्या असलेल्या लुईसने डावीकडे सूर मारून चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो जखमी झाला. लगेच फिजिओ मैदानावर आला आणि त्याच्यावर उपचार केले. नंतर तो काही काळ मैदानाबाहेर गेला. पण, तो नंतर फलंदाजीसाठी परत मैदानावर आला आणि ६ धावा केल्यावर बाद झाला.
जर लुईसची दुखापत गंभीर झाली, तर राजस्थान रॉयल्ससाठी हा मोठा धक्का असेल. कारण अनेक अनुभवी खेळाडूंना माघार घेतल्याने संघ आधीच अडचणीत सापडला आहे. बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर सारखे स्टार खेळाडू आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसणार नाहीत.
लुईस राजस्थानसाठी खूप महत्त्वाचा खेळाडू सिद्ध होऊ शकतो. कारण तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. लुईसला जॉस बटलरच्या जागी संघात निवड करण्यात आली होती. आपल्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाडूने टी२० मध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भारतीय क्रिकेटची खरी संपत्ती’, गांगुलीने सांगितले विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्यामागील खरं कारण
मलिंगाला मागे टाकत ‘या’ भारतीय दिग्गजाला आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची संधी