नागपूर। रणजी ट्रॉफी 2018-19चा अंतिम सामना विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. यामध्ये सौराष्ट्राला जिंकण्यासाठी 148 धावांची गरज आहे.
यासाठी सौराष्ट्राकडे फक्त उद्याचा एकच दिवस असून हातात 5 विकेट्स शिल्लक आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या स्टार खेळाडूंनी निराशा केली आहे. सौराष्ट्राच्या चेतेश्वर पुजाराने दोन डावात 0 आणि 1 तर विदर्भाकडून खेळत असलेल्या वसीम जाफरने 23 आणि 11 धावा केल्या आहेत.
या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद 312 धावा तर दुसऱ्या डावात 200 धावा केल्या. त्यांच्याकडून आदित्य सरवटेने दुसऱ्या डावात 49 धावा केल्या तर आतापर्यंत सामन्यात 8 विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली आहे.
जाफर फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी त्याने क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी करत 5 झेल घेतले आहेत.
सौराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद 307 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर स्नेल पटेलने महत्त्वपूर्ण शतकी खेळी केली. त्याने 209 चेंडूत 15 चौकाराच्या मदतीने 102 धावा केल्या. तर कर्णधार जयदेव उनाडकटने 46 धावा करताना 3 विकेट्सही घेतल्या.
त्याचबरोबर गोलंदाजीत धर्मेंद्रसिंह जडेजाने दुसऱ्या डावात विदर्भाला रोखण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. या सामन्यात त्याने 7 विकेट्स घेत या रणजी मोसमातील 59 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
सध्या सौराष्ट्राचे 5 फलंदाज 58 धावांत तंबूत परतले असून त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तर कमलेश मकवाना नाबाद 2 धावावर खेळत आहे.
गतविजेता विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. तर सौराष्ट्राचे पहिल्यांदा रणजी जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा जेव्हा धोनी जबरदस्त खेळतो तेव्हा तेव्हा भारत तो सामना हरतो…
–जर आजच्या सामन्यात युवराज असता तर टीम इंडिया पराभूत झाली नसती
–आजचा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी, कधीही विचार नाही केला तो विक्रम नावावर