सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना चालू असून आज (११ जानेवारी) सामन्याचा पाचवा दिवस आहे. यादिवशी भारताने २ बाद ९८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारतापुढे विजयासाठी ३००हून अधिक धावांचे तगडे आव्हान असताना कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या ४ धावांवर बाद झाला. परंतु दुखापतीतून पुनरागमन केलेल्या रिषभ पंतने आक्रमक खेळी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र शतक पुर्ण व्हायच्या आत तो बाद झाला. त्यानंतर पव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी त्याच्या दमदार खेळीचे साधे कौतुकही न केल्याचा प्रकार दिसून आला.
झाले असे की, रहाणेची महत्त्वपुर्ण विकेट गमावल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज पंतकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पंतने सुरुवातीला जोरदार फटकेबाजी करत मोठ्या आकडी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली. परंतु शतकाच्या नजीक पोहोचले असताना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने पॅट कमिन्सच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९७ धावा करत तो मैदानाबाहेर पडला.
पंत मोक्याच्या क्षणी आणि शकतासाठी केवळ ३ धावा बाकी असताना विकेट गमावल्यामुळे नाराज दिसत होता. मात्र पव्हेलियनमध्ये आल्यानंतर भारतीय संघातील इतर खेळाडूंनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. असे असले तरी, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड पंतच्या खेळीवर समाधानी असल्याचे दिसून आले नाही. दोघेही टाळ्या वाजवणे दूर साधे उभेदेखील राहिले नाहीत. त्यांना पंतकडून अजून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, असेच त्यांच्या हावभावावरुन दिसत होते.
पंतच्या रुपात चौथी विकेट गमावल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या ४ बाद २५० धावा इतकी झाली आहे. कसोटी स्पेशलिस्ट हनुमा विहारी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. आता चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी बचावात्मक खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होतील का नाही?, हे पाहावे लागेल.
महत्त्वाचे बातम्या-
पंत भाऊ चमकले! सिडनी कसोटीत अर्धशतक झळकावत धोनीसह ‘या’ दिग्गजाला टाकलं पिछाडीवर