आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यामध्ये त्यांचा सामना ५ मार्चला इंग्लंडशी होणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार असून त्याची सुरूवात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. बाद फेरीचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असून भारतीय संघाला अभिषेक शर्माबाबत महत्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अशातच भारताच्या दिग्गजांनी त्याला बाकावर ठेवले पाहिजे की खेळवले पाहिजे याचा सल्ला दिला आहे.
भारताचा सलामीवीर अभिषेक या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात सतत अपयशी ठरत आहे. तरीही संघ व्यवस्थापनाने त्याला अंतिम अकरामध्ये संधी दिली. आता उपांत्य फेरीच्या या महत्वाच्या सामन्यात त्याला खेळवावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या स्पर्धेत तो लागोपाठ तीन वेळा शून्यावर बाद झाला. त्याची मानसिक स्थिती पाहून तो खेळण्यास तयार आहे की नाही हे आधी पाहावे आणि मगच निर्णय घ्या असे रवी शास्त्रींनी म्हटले आहे.
शास्त्री म्हणाले, “जेव्हा संघ व्यवस्थापकांना असे वाटले की तो मानसिकरित्या विचल आहे आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याशी बोलून किंवा नेटमध्ये त्याचा सराव पाहून ठरवावे.”
“जेव्हा ईशान किशन आणि संजू सॅमसन सलामीला येतील तेव्हा भारताच्या फलंदाजी क्रमाकांबद्दल विचार करेल”, असे शास्त्रींनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अभिषेकने इंग्लंडविरुद्ध केलेल्या शतकाचाही उल्लेख केला. त्याने मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध वानखेडेवरच १३५ धावांची खेळी केली होती. त्याने ५४ चेंडूत ७ चौकार आणि १३ षटकार मारले होते. त्याची ही खेळी एका भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी२०मधील केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे.
अभिषेकला संघाबाहेर केले तर रिंकू सिंगने मधल्या फळीत खेळावे, असेही शास्त्रींनी सुचविले आहे. ते म्हणाले,” ईशान सलामीला आला तर रिंकू त्यानंतर खेळेल. हा एक बदल होऊ शकतो, मात्र माझ्या मते अभिषेकला खेळवावे. त्याने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्याने जलद शतके केली आहेत. त्याच्या फलंदाजीत ती ताकद आहे. यामुळे मला वाटते त्याला खेळवावे.”
अभिषेक नेटमध्ये कसून सराव करत आहे. त्याने या स्पर्धेत अर्धशतकी खेळी केली होती, मात्र तो वेस्ट इंडिजविरुद्ध धावा करण्यात पुन्हा अपयशी ठरला. दुसरीकडे ईशान आणि संजू चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. यामुळे आजही त्याला संधी मिळणार की रिंकू परतणार, हे कळेलच.





