इंग्लंड विरुद्ध भारत संघात चालू असलेल्या पहिला कसोटी सामन्याचा शुक्रवारी ( ६ ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. मध्यफळीतील अनुभवी फलंदाजांनी निराशा केल्यानंतर केएल राहुल व अष्टपैलू रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावत भारतीय संघाला धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यादरम्यान जडेजाने एक खास विक्रम करत भारतीय दिग्गजांच्या यादीत आपले नाव नोंदवले.
राहुल-जडेजा जोडीने सावरला भारताचा डाव
तिसर्या दिवशी सकाळी रिषभ पंत लवकर बाद झाल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा हा केएल राहुलच्या साथीला आला. दोघांनी ५० धावांची भागीदारी केली. राहुल ८४ धावांवर बाद झाला, तर जडेजाने ८६ चेंडूत ५६ धावांची खेळी केली.
जडेजाने मिळवले खास पंक्तीत स्थान
रवींद्र जडेजाने त्याच्या अर्धशतकी खेळीदरम्यान १५ वी धाव घेत कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार केला. यासह तो कसोटीमध्ये दोन हजार धावा व दोनशे बळी मिळवणारा पाचवा भारतीय अष्टपैलू ठरला. जडेजाने आत्तापर्यंत भारतासाठी ५२ कसोटी खेळताना २२१ बळी मिळवले आहेत. तसेच, फलंदाजीत १६ अर्धशतके व एक शतक झळकावले आहे.
या भारतीयांनी केली आहे यापूर्वी अशी कामगिरी
भारतासाठी कसोटीमध्ये सर्वप्रथम २००० धावा व २०० बळी घेण्याची कामगिरी माजी कर्णधार कपिल देव यांनी केली होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ५२४८ धावा व ४३४ बळी मिळवले होते. भारताचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी २५०६ धावा आणि ६१९ बळी घेतले आहेत. हरभजन सिंग यानेदेखील आपल्या कारकीर्दीत २२२४ धावा व ४१३ बळी आपल्या नावावर केले असून, अशी कामगिरी करणारा चौथा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आहे. त्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत २६८५ धावा व ४१३ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अँडरसन आणि सिराज आले आमने-सामने, ‘अशी’ झाली झटापट; व्हिडिओ व्हायरल
ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम! केएल राहुलला बाद करत अँडरसन बनला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज
Video: ट्रेंट ब्रिजमध्ये फिरली जडेजाची तलवार, अर्धशतकानंतर केले धमाकेदार सेलिब्रेशन