भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक अव्वल खेळाडू आहे. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीसह खालच्या फळीत तो उपयुक्त फलंदाजी देखील करतो. इतकेच नव्हे तर आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने देखील अनेकदा त्याने संघाच्या विजयात हातभार लावला आहे. त्यामुळे भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा नियमित सदस्य असतो.
मात्र जडेजाची कसोटी कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी प्रभावी आहे की नाही, या प्रश्नामुळे त्याला अनेकदा कसोटी संघात सातत्याने संधी मिळत नाही. याच कारणाने मध्यंतरीच्या काळात त्याला जवळपास दीड वर्षे संघाबाहेर जावे लागले होते. या कठीण काळातला अनुभव नुकताच जडेजाने उलगडला.
“पुनरागमन करणे होते कठीण”
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जडेजाने हा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “खरं सांगायचं तर ती दीड वर्षे खूप कठीण होती. मला तर रात्री झोप देखील लागत नव्हती. मला आठवते आहे की त्या काळात मी पहाटे ४-५ वाजता उठायचो. आणि सतत हाच विचार करत असायचो की मी पुनरागमन कसे करू शकेल? मी झोपूच शकलो नाही. मी आडवा पडून राहायचो पण झोप लागत नसे. मी कसोटी संघात होतो. पण आम्ही परदेशात खेळत असल्याने मला संघात संधी मिळत नव्हती. मी वनडे क्रिकेट पण खेळत नव्हतो. मी स्थानिक क्रिकेट देखील खेळत नव्हतो, कारण भारतीय संघासह दौर्यावर असायचो. मला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळत नव्हती. त्यामुळे मी पुनरागमन कसे करू शकेल, याचाच सतत विचार करत असे.”
साल २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतून त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने या सामन्यात अप्रतिम खेळी साकारली होती. या सामन्याबाबत बोलतांना तो म्हणाला, “त्या सामन्याने माझ्यासाठी सगळया गोष्टी बदलून टाकल्या. माझा खेळ, माझा आत्मविश्वास, माझी कामगिरी असं सगळंच. ज्यावेळी तुम्ही सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणासमोर इंग्लिश वातावरणात धावा काढता, त्यावेळी तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. यामुळे तुमच्यात ही भावना निर्माण होते की जगात तुम्ही कुठेही धावा काढू शकता.”
या सामन्यानंतर गेल्या काही वर्षांत जडेजा आता भारतीय संघाचा नियमित सदस्य झाला आहे. आगामी जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौर्यावर जाणार असून या दौऱ्यात जडेजा देखील संघाचा भाग आहे. मागील इंग्लंड दौऱ्यावरील शानदार कामगिरीची पुनरावृत्ती या दौऱ्यात करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये या भारतीय खेळाडूवर असेल सर्वाधिक दबाव, माजी दिग्गजाने मांडले मत
तब्बल ७ वर्षांनंतर कसोटी खेळण्यास भारतीय महिला संघ सज्ज, पाहा ‘अशी’ आहे नवी जर्सी
‘ऑस्ट्रेलियाला चकित होण्याची गरज नाही, त्यांना भारताचे स्टँडबाय खेळाडूसुद्धा पराभूत करतील’