एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे बुधवार रोजी (१४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२१ चा सहावा सामना झाला. या थरारक सामन्यात ६ धावांनी हैदराबादला चितपट करत बेंगलोरने हंगामातील सलग दुसरा विजय साजरा केला. परंतु शानदार विजयानंतर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याच्या आनंदावर विरजण लागले आहे. सामन्यादरम्यान त्याने केलेल्या एका असभ्य कृतीमुळे सामना रेफरींनी त्याला फटकारले आहे.
बाद झाल्याचा राग काढला खुर्चीवर
बेंगलोरकडून सलामीवीर म्हणून उतरलेल्या विराटने २९ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. बेंगलोरच्या डावातील तेरावे षटक टाकण्यासाठी अष्टपैलू जेसन होल्डर आला. होल्डरने काहीसा आखूड टप्प्याचा टाकलेला पहिला चेंडू विराटने लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित न लागल्याने उंच उडाला व स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करणाऱ्या विजय शंकरने अत्यंत सोपा झेल पकडला.
बाद झाल्यानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रूमकडे जात असताना संघाच्या डग आऊटमध्ये खिलाडूवृत्तीला न शोभणारी कृती केली. विराटने सीमारेषेबाहेर येताच ड्रेसिंग रूमकडे जात असताना खुर्चीवर बॅट मारून खुर्ची पाडली. एवढेच नव्हे तर, सीमारेषेजवळील जाहीरातीच्या बोर्डवरही बॅट मारली. रागाच्या भरात केलेल्या या अशोभनीय कृतीमुळे सामना रेफरी वेंगालील नारायण कुट्टी यांनी त्याच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याने जबरदस्त फटकार लावली आहे.
https://twitter.com/kamalpariharinc/status/1382363467428990979?s=20
Think @imVkohli is a bit cross #IPL2021 pic.twitter.com/nzEtxry6ic
— simon hughes (@theanalyst) April 14, 2021
त्यामुळे आयपीएलच्या स्तर १ मधील कलम २.२ चे उल्लंघन केल्याचा आरोप विराटवर करण्यात आला आहे. हा कलम, सामन्यादरम्यान कोणती क्रिकेट उपकरणे, कपडे किंवा मैदानी साहित्यासोबत दुर्व्यवहार करण्याशी संबंधित आहे.
आयपीएल २०१६ मध्ये बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा तत्कालिन कर्णधार गौतम गंभीरने अशाच प्रकारची कृती केली होती. त्यावेळी सामना रेफरींनी त्याला फक्त फटकारले नव्हते तर सामना शुल्काच्या १५ टक्के दंडही आकारला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मला राग येतोय! आऊट होऊन मैदानातून बाहेर जाताना विराटचा चढला पारा, मग केले असे काही; व्हिडिओ व्हायरल
हैदराबादचा पराभव झाला असला तरी अर्धशतकी खेळी करणाऱ्या वॉर्नरचा मोठा विक्रम; रोहित, धवनला टाकले मागे
पांडेजींची कमाल! सूर मारत टिपला वॉशिंग्टन सुंदरचा लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ