दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या रोमांचक स्थितीत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी २ सामने जिंकले असून मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. अशात रविवारी (१९ जून) एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे दोन्ही संघात पाचवा आणि अखेरचा टी२० सामना होणार आहे, जो निर्णायक असेल. हा सामना जिंकत प्रभारी कर्णधार रिषभ पंत याच्याकडे विलक्षण विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल.
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनाही जे करता आले नाही, ते करत रिषभ पंत (Rishbh Pant) मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
यजमान भारतीय संघाने पराभवासह या टी२० मालिकेची (T20 Series) सुरुवात केली होती. दिल्लीत झालेला पहिला टी२० सामना दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यातही भारतीय संघाचा ४ विकेट्सने पराभव झाला होता.
मात्र त्यानंतर तिसरा टी२० सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आणि त्यांनी मालिकेत दमदार पुनरागमन केले. विशाखापट्टणममध्ये झालेला हा सामना भारतीय संघाने ४८ धावांनी जिंकत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. त्यानंतर राजकोटवरील चौथा टी२० सामना ८२ धावांनी जिंकत भारतीय संघाने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. अशात आता बेंगलोरमध्ये होणारा पाचवा टी२० सामना दोन्हीही संघांसाठी निर्णायक असेल.
जर पंतच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर ३-२ च्या फरकाने मालिकाही त्यांच्या नावे होईल. यासह पंत भारतभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा पहिलावहिला कर्णधार बनेल. कारण यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला मायभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आलेले नाही. आतापर्यंत २ वेळा दक्षिण आफ्रिका संघाने भारतात टी२० मालिका खेळली आहे. या मालिकांमध्ये एकदा धोनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होता, तर दुसऱ्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. या दोन्हीही मालिका भारतीय संघाला जिंकता आल्या नव्हत्या.
वर्ष २०१५ मध्ये झालेली टी२० मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० ने जिंकली होती. या मालिकेतील १ सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. तसेच २०१९ मध्ये विराटच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने टी२० मालिका १-१ नो बरोबरीत राखली होती. या मालिकेतही एक सामना होऊ शकला नव्हता.
अशात आता पंत ही मालिका तोडत भारतीय संघाला भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून देऊ शकेल की नाही, हे पाहावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अजून खूप क्रिकेट खेळायचंय!’, रोहितने कार्तिकला दिलेला जुना सल्ला होतोय व्हायरल
मुंबई-मध्य प्रदेशमध्ये रंगणार रणजी ट्रॉफीची फायनल, जाणून घ्या आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर
मध्य प्रदेशचा बंगालवर विक्रमी विजय, १७४ धावांनी सामना जिंकत २३ वर्षांनंतर गाठली फायनल