बुधवारी (२९ सप्टेंबर) दुबई येथे इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) मधील ४३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करत प्ले ऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. राजस्थानसाठी हा पराभव म्हणजे स्पर्धेतील आव्हान संपल्यासारखे आहे. मात्र, या पराभवानंतर राजस्थानचा युवा फलंदाज रियान पराग याच्यावर सडकून टीका होतेय.
पुन्हा फ्लॉप ठरला रियान
राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला आसामचा २१ वर्षीय फलंदाज रियान पराग हा आयपीएलच्या उत्तरार्धात कमालीचा फ्लॉप ठरत आहे. आयपीएलच्या उत्तरार्धात खेळलेल्या चार सामन्यात तो अनुक्रमे ४, २, ० व ९ धावा काढू शकला आहे. बेंगलोर विरुद्धच्या सामन्यातही तो १६ चेंडूंचा सामना करून अवघ्या ९ धावा काढून तंबूत परतला.
चाहत्यांनी घेतले निशाण्यावर
सततच्या खराब कामगिरीमुळे रियानला आता चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,
‘आता रियानने आयपीएलमधील धावांपेक्षा अधिक डान्स केला आहे.’
Riyan Parag has more dance performance than IPL runs. #RRvsRCB
— Mayur Kanade (@redkopmayur) September 29, 2021
दुसऱ्या चाहत्याने लिहिले,
‘ज्याप्रकारे पान पराग आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याचप्रमाणे रियान पराग राजस्थान रॉयल्ससाठी आहे.’
Just as Pan Parag to health….Riyan Parag to @rajasthanroyals …! #RRvsRCB #HarshalPatel #Riyanparag
— Biswadeep Bandyopadhyay (@bswadp15) September 29, 2021
अन्य एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले,
‘रियानला संघाचा कर्णधार किंवा प्रशिक्षक यांची काही तरी गुपिते माहीत असणार म्हणूनच त्याला संघात स्थान दिले जात आहे.’
Riyan Parag must have some secrets of captain or coach. #RRvsRCB
— Abhimanyu Chauhan (@satanabhi) September 29, 2021
राजस्थानचा पुन्हा पराभव
सलग दोन पराभवानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानला या सामन्यात यशस्वी जयस्वाल व एविन लुईस यांनी ७७ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर त्यांचा एकही फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. लुईसने राजस्थानसाठी सर्वाधिक ५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बेंगलोरसाठी ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद अर्धशतक झळकावले. यष्टीरक्षक एस. भरतने ४४ धावांचे योगदान दिले व संघाला ७ गड्यांनी विजय मिळवून दिला. दोन बळी घेणारा बेंगलोरचा युजवेंद्र चहल सामनावीर ठरला.