जगभरातील नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती होण्यासाठी सुरु केल्या गेलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामाच्या यशस्वी आयोजनानंतर या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची चर्चा सुरू झाली आहे. २०२२ च्या सुरुवातीला स्पर्धेचा दुसरा हंगाम खेळवला जाऊ शकतो. निवृत्त झालेले दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतात. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्स संघ या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे.
दोन सत्रात खेळला गेला पहिला हंगाम
महाराष्ट्र सरकार, रस्ते सुरक्षा विभाग व भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या कल्पनेतून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. २०२० मार्चमध्ये मुंबई आणि पुणे येथे स्पर्धा सुरू झाली. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर, चालू वर्षी रायपूर येथे उर्वरित स्पर्धा खेळली गेली.
या स्पर्धेमध्ये भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया हे संघ सहभागी झालेले. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलिया सहभागी होऊ न शकल्याने इंग्लंड व बांगलादेश संघांना खेळण्याची संमती देण्यात आली होती.
या ठिकाणी होऊ शकतो दुसरा हंगाम
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात येऊ शकते. श्रीलंका लिजेंड्स संघ पहिल्या हंगामाचा उपविजेता होता. या व्यतिरिक्त संयुक्त अरब अमिराती (युएई) व दक्षिण आफ्रिका देखील यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. ही स्पर्धा ९ जानेवारी २०२२ ते १६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत खेळली जाऊ शकते.
भारत आहे गतविजेता
रायपूर येथे झालेल्या पहिल्या हंगामाच्या अंतिम फेरीत इंडिया लिजेंड्स संघाने श्रीलंका लिजेंड्सवर १४ धावांनी विजय मिळवला होता. युवराज सिंग व युसुफ पठाण यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर भारताने १८२ धावांचे लक्ष श्रीलंकेला दिले होते. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेला हे आव्हान पार करता आले नाही. या सामन्यामध्ये २०११ वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेले दोन्ही संघाचे अनेक खेळाडू खेळलेले. श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान या स्पर्धेचा मानकरी ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आपल्या आजवरच्या कारकिर्दीबाबत रिषभ म्हणाला, “हा अद्भुत प्रवास”