जगभरातील टेनिस चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत भाग घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. फेडररच्या गुडघ्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया झाल्याने त्याच्या सहभागाविषयी साशंकता होती. मात्र, त्याने सरावाला सुरुवात केल्याने त्याचा सहभाग निश्चित झाला आहे.
या स्पर्धेत सेरेनाला महिला एकेरीतील २४वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावत सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. या दोघांसह आठ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचा विजेता नोवाक जोकोविच आणि जागतिक महिला टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थानावरील ऍश्ले बार्टी देखील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होतील.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे आयोजन अधिकारी क्रेग टिर्ले याबाबत बोलताना म्हणाले, “या वेळेची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आधीपेक्षा वेगळी असेल. यावेळी खेळाडूंच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असेल. संपूर्ण स्पर्धा सुरक्षित वातावरणात खेळविण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. खेळाडूंनीही गेले वर्षभर प्रेक्षकांची अनुपस्थिती जाणवली असेल.”
दिग्गज खेळाडूंच्या सहभागाबद्दल बोलताना ते म्हणाले, “यामुळे स्पर्धा नक्कीच रंगतदार होईल. अनेक खेळाडू दुखापतीमुळे, तर काही खेळाडू वैयक्तिक कारणामुळे टेनिसपासून दूर होते. मात्र, हे सगळेच पुनरागमन करत आहेत. सेरेना यावेळी तिच्या आठव्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी प्रयत्न करेल, तर नोवाक जोकोविच नवव्यांदा हा किताब जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. फेडरर आणि ऍश्ले बार्टीही दुखापतीतून सावरत पुनरागमन करीत आहेत.”
या स्पर्धेत पुरुष एकेरीत जोकोविच आणि फेडरर व्यतिरिक्त जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला राफेल नदाल, डॉमिनिक थिम, डॅनिल मेदवेदेव, स्टिफानोस स्तिस्तिपास, अलेक्झांडर झ्वेरेव, एँड्रे रुबलेव्ह असे अनेक खेळाडूही भाग घेतील. सोबतच महिला एकेरीत सेरेना आणि बार्टीसह जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली सिमोना हालेप, २०२० सालची अमेरिकन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका, ऑस्ट्रेलियन ओपनची गतविजेती सोफिया केनीन, एलिना स्वितोलिना, कॅरोलिना प्लिस्कोवा, पेट्रा क्विटोवा या खेळाडू विजेतेपदासाठी झुंज देतील.
दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन विजेती विक्टोरिया अजारेंका २०२० मध्ये या स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. मात्र यावेळला तीदेखील पुनरागमन करत आहे. पुरुष आणि महिला एकेरीत एकूण १०४ खेळाडूंना स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळेल, तर ८ खेळाडू वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश मिळवतील.
सन २०२१ साली ही स्पर्धा ८ ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा जानेवारी ऐवजी फेब्रुवारी स्पर्धेत घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष गटाची पात्रता स्पर्धा १० ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित केली गेली आहे. या पात्रता फेरीनंतर सगळे खेळाडू मेलबर्न येथे १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, हे दोन खेळाडू करणार पदार्पण
– मी नाही, माझं कामच बोलेल! निवड समीतीचे प्रमुख चेतन शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया
– केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादमधून होणार बाहेर? वॉर्नरने दिले हे उत्तर