पुणे: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन यांना दुहेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. चौथ्या पर्वातील या स्पर्धेला पुण्यातण्यात म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम येथे 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
याच महिन्यात अॅडलेड आंतरराष्ट्रीय या एटीपी २५० मालिकेतील स्पर्धेत अव्वल मानांकित जोडीला हरवून विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय जोडीला एकत्रित १५६ मानांकनामुळे थेट प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेत १४ जोड्यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. देशातील सर्वात जु्न्या टाटा ओपन स्पर्धेचे अधिकार आयएमजीकडे असून, भारतात राईज वल्डवाईड मार्फत तिचे काम चालते.
रोहन बोपण्णाने दिवीज शरणच्या साथीत २०१९ आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. रामकुमारला पूरव राजाच्या साथीत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता रामकुमार आणि बोपण्णा एकत्र खेळत असून, या वर्षात केलेली विजयी सुरवात ते पुण्यात कायम राखण्यास उत्सुक असतील.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेत २०२० मध्ये उपविजेते राहिलेल्या मॅक्स पर्सेल आणि ल्युक सेव्हिले यांना दुहेरीच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. पुण्यात २३ वर्षीय पर्सेल देशवासीय मॅथ्यू एबडेन याच्यासाथीत खेळणार आहे. याच स्पर्धेत गेल्या वर्षी तो भारतीय लिअॅंडर पेसच्यासाथीत खेळला होता. सेव्हिले जॉन पॅट्रिक स्मिथच्या साथीत खेळणार आहे.
भारतीय खेळाडूंना टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत खेळताना पाहून आम्हाला अधिक आनंद होतो. भारतीय खेळाडूंना अधिक संधी मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत नेहमीच भारतीय खेळाडू दुहेरीत चांगले खेळत आले आहेत आणि यावर्षी देखिल भारतीयांचा खेळ चांगला होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात, त्यांच्यासमोर असलेले कठिण आव्हान विसरून चालणार नाही. यावर्षी अधिक दर्जेदार खेळाडू यास्पर्धेत खेळणार आहेत, असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.
युवा लॉरेन्झो मुसेट्टी, २०१८ अमेरिकन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा राडु अल्बोट, रिचर्ड बेरान्कीस आणि स्टिफानो ट्राव्हाग्लिआ यांना एकेरीसह दुहेरीतही थेट प्रवेश देण्यात आला आहे.
कोविड १९च्या संकटकाळामुळे दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर होणारी टाटा ओपन ही एकमेव दक्षिण आशियातील एकमेव एटीपी स्पर्धा आहे. यावर्षीही कोविडची भिती आहे. सध्याची परिस्थिती आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रसार बघता संपूर्ण स्पर्धा ही जैव सुरक्षा चक्रात (bio bubble) घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी नसेल. स्पर्धा सुरु होण्यासस आता केवळ दोन आठवड्याचा अवधी बाकी आहे. सर्व गोष्टी वेळेवर पार पडाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत. खेळाडूंच्या व्हिसापासून त्याच्या केंद्र तसेच राज्याच्या परवानगीपर्यंत सर्व गोष्टी वेळेवर होणे आजच्या संकटकाळाच्या दृष्टिने आवश्यक आहे, असे टाटा ओपन महाराष्ट्रचे खजिनदार संजय खंदारे यांनी सांगितले. सरकारच्या सर्व परवानगीबाबतचे काम खंदारे सांभाळत आहेत.
आपल्या लाडक्या खेळाडूंचा खेळ प्रेक्षक गॅलरीतून पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. पण, सध्याची परिस्थिती आम्हाला प्रेक्षकांच्या प्रवेशाची परवानगी देत नाही. खेळाडू तसेच स्पर्धेशी निगडीत सर्वच व्यक्तींच्या आरोग्याची काळजी महत्वाची आहे. आम्ही देखिल त्याला प्राधान्य देत आहोत. कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे आम्ही काटेकोर पालन करणार आहोत. नियमानुसार आम्ही कोविड चाचण्याही घेणार आहोत, असे संयोजन सचिव प्रविण दराडे यांनी सांगितले.
जागतिक क्रमवारीत ४९व्या स्थानावर असलेला युक्रेनचा इल्या मार्चेन्को याच्यासह ११ टेनिसपटूंना एकेरीतून पात्रता फेरीसाठी थेट प्रवेश देण्यात आला असून, ते मुख्य फेरीतील चार जागांसाठी आपले कौशल्य पणाला लावतील. मार्चेन्को याना यापूर्वी दोन वेळचा ऑलिंपिक विजेता आणि जागतिक क्रमवारीत आघाडीचे स्थान भूषविलेल्या अॅंडी मरे याला हरवून इटलीतील बिएला येथील एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मुख्यफेरीत खेळणारा अॅलेक्झांडर वुचिच , ख्रिस्तोफर ऑकोनेल हे अन्य दोन प्रमुख खेळाडू पात्रता फेरीतून आपले नशीब अजमावतील. पात्रता फेरीच्या लढती ३० आणि ३१ जानेवारीस होणार आहेत.