विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजीला उतरताच रोहित शर्माच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
हा डाव रोहितचा सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 200 वा डाव ठरला आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 200 किंवा त्यापेक्षा अधिक डाव खेळणारा आठवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याच्याआधी विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, शिखर धवन, सौरव गांगुली, गौतम गंभीर आणि के श्रीकांत यांनी भारताकडून 200 पेक्षा अधिक डाव सलामीवर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत.
यामध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव विरेंद्र सेहवागने खेळले आहेत. त्याने 388 डावात सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे.
रोहितने सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 176 धावांची शतकी खेळी केली होती.
भारताकडून सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव खेळणारे क्रिकेटपटू –
388 डाव – विरेंद्र सेहवाग,
342 डाव – सचिन तेंडुलकर
286 डाव – सुनील गावस्कर
243 डाव – शिखर धवन
237 डाव – सौरव गांगुली
228 डाव – गौतम गंभीर
217 डाव – के श्रीकांत
200 डाव – रोहित शर्मा






