इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड संघाला खेळाच्या तीनही विभागात मात दिली. असे असले तरी, भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यापुढे त्याचाच संघ सहकारी रोहित शर्मा नवे आव्हान उभे करत आहे.
रोहितपासून विराटला धोका
सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला. त्याच्या बॅटमधून शतक आले नसले तरी, त्याची फलंदाजी आश्वासक वाटत आहे. नॉटिंघम कसोटीत त्याने ३६ धावांची उपयुक्त खेळी केली होती. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८३ धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी केली. यामुळे रोहितचे आयसीसी कसोटी क्रमवारीतील सहावे स्थान अबाधित राहिले.
विराटचा बॅडपॅच सुरूच
एकीकडे रोहित चांगल्या फॉर्ममध्ये असताना भारतीय कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत आहे. नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या डावात तो गोल्डन डकवर बाद झालेला. दुसऱ्या कसोटीतही तो दोन्ही डावात मिळून ६२ धावा बनवू शकला. त्याच्या या खराब फॉर्ममुळे तो फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर कायम असला तरी त्याचे गुण मात्र कमी झाले आहेत.
रोहितला होऊ शकतो फायदा
विराटच्या खराब फॉर्मचा फायदा रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत होण्याची शक्यता आहे. २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात, रोहितने ५० पेक्षा जास्त धावा केल्या आणि विराट अपयशी ठरला तर रोहित त्याला पछाडत पाचव्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या विराटच्या नावे ७७६ तर, रोहितच्या नावे ७७३ गुण जमा आहेत. त्यामुळं रोहितकडे प्रथमच विराटला मागे टाकण्याची संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भर मैदानात तंबू लावून सामन्याचा आनंद लुटू लागला ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ बघून म्हणाल, ‘ओळखीचा दिसतोय’
‘महिलांसाठी ६ संघांची आयपीएल सुरू करा’; स्म्रीती मंधानाची मागणी पूर्ण करणार का बीसीसीआय?
हेडिंग्ले कसोटीत पुनरागमनाच्या इराद्याने उतरणार इंग्लंड, असा असेल फलंदाजी क्रम