भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये भारत अजिंक्य राहिला आहे. या विजयानंतर 16 गुणांसह भारत पॉईंट्स टेबलमध्येही अव्वलस्थानी विराजमान आहे. तसं पाहिलं, तर रोहित शर्मा याने संघासाठी विश्वचषकात मोलाचे योगदान दिले आहे. त्याची विश्वचषकातील विजयाची टक्केवारी 100 टक्के आहे. मात्र, एक वेळ अशीही होती, जेव्हा रोहितला संघाचे नेतृत्व करायचे नव्हते. याचा खुलासा बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने केला आहे.
रोहितच्या नेतृत्वाविषयी गांगुलीचा खुलासा
बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाविषयी एका स्थानिक न्यूज चॅनेलशी बोलताना भाष्य केले. तो म्हणाला की, “रोहितला नेतृत्व करायचे नव्हते, कारण त्यावेळी तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळत होता.”
मात्र, गांगुलीने त्याची समजूत काढून त्याला मनवले. गांगुली पुढे बोलताना म्हणाला की, “मी त्याला म्हणालो की, तुला हो म्हणावे लागेल, किंवा मी कर्णधार म्हणून तुझ्या नावाची घोषणा करेल. मी खुश आहे की, तो हो म्हणाला आणि आता पुढे येऊन संघाचे नेतृत्व करत आहे. तुम्ही त्याची कामगिरी पाहू शकता.”
विश्वचषकातील रोहितची कामगिरी
रोहित शर्मा याने विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने 8 सामने खेळताना 55.25च्या सरासरीने 442 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. 131 ही त्याची स्पर्धेतील सर्वोच्च खेळी आहे.
कर्णधार म्हणून रोहितची आकडेवारी
कर्णधार म्हणून रोहित शर्मा याची आकडेवारी खूपच शानदार राहिली आहे. आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, रोहितने प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले आहे. रोहित आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाला 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. याव्यतिरिक्त भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली आशिया चषकही जिंकला आहे. तसेच, त्याच्या नेतृत्वाखालीच भारत तिन्ही क्रिकेट प्रकारातील अव्वल संघही बनला आहे. (rohit sharma does not wanted captaincy reveal former BCCI Chief sourav ganguly)
हेही वाचा-
सेहवागच्या पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ; म्हणाला, ‘पाकिस्तान जिंदा…’
आजोळच्या घरी पोहोचताच आजीने काढली रचिन रवींद्रची दृष्ट, व्हिडिओ जिंकतोय सर्वांची मने