आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली. यानंतर दोन्ही खेळांडूंमधील संबंध ताणले गेल्याचं वृत्त आलं होतं. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर रोहित शर्मा सोमवारी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. परतल्यानंतर त्यानं नेटमध्ये खूप घाम गाळला. हार्दिक पांड्यानंही दुखापतीतून सावरल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सराव सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहतापाहता व्हायरल झाला.
𝟰𝟱 🫂 𝟯𝟯#OneFamily #MumbaiIndians | @hardikpandya7 @ImRo45 pic.twitter.com/eyKSq7WwCV
— Mumbai Indians (@mipaltan) March 20, 2024
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यामागे कोणतंही ठोस कारण समोर आलेलं नाही. गेल्या काही हंगामांपासून आयपीएलमधील रोहितची फलंदाजी फारशी दमदार राहिलेली नाही. त्यामुळे त्यानं या आयपीएलमध्ये मनसोक्त फलंदाजीचा आनंद घ्यावा यासाठी त्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं असल्याचं बोललं जातंय. मात्र रोहितच्या फॅन्सना संघाचा हा निर्णय आवडलेला नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहितला पुन्हा मुंबईचा कर्णधार बनवण्याची मागणी लावून धरली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ अलिबागला पोहोचला तेव्हाही हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाच्या बातम्यांनी जोर पकडला होता. या टीम बाँडिंग सेशनमध्ये रोहित शर्मा दिसला नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, रोहित शर्मानं अतिरिक्त सराव करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला होता.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स 24 मार्चला हार्दिकची जुनी टीम गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. आता या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ कसा खेळेल आणि रोहित शर्मा कशी कामगिरी करेल, हे पाहणे महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या जागी ‘हा’ गोलंदाज आयपीएलमध्ये खेळणार, मुंबई इंडियन्समध्ये 17 वर्षीय खेळाडूची एंट्री
क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूनं घेतला जगाचा निरोप
IPL 2024 मधून आणखी एक बडा खेळाडू बाहेर, ‘वैयक्तिक कारणांमुळे’ घेतली माघार