इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला १५७ धावांनी धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा या सामन्याच्या शिल्पकार ठरला. त्याने सामन्यातील दुसऱ्या डावात जोरदार शतक झळकावले होते. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
परंतु, या खेळीनंतर तो दुखापतीमुळे क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला नव्हता. आता तो आगामी कसोटी सामन्यात खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, स्वतः रोहित शर्मानेच आगामी कसोटी सामन्यात खेळण्याबाबत मोठी माहिती दिली आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये मालिकेतील अंतिम कसोटी सामना येत्या १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला कसोटी मालिका ३-१ ने जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
या मालिकेतील पहिल्या सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. या संपूर्ण मालिकेत रोहितने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम कसोटी सामन्यात रोहितची अनुपस्थिती भारतीय संघाच्या चिंतेत वाढ करू शकते.
रोहितला जेव्हा दुखापती बाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने म्हटले की, “सध्या मी ठीक आहे. परंतु, फिजीयोने दिलेल्या सल्यानुसार प्रत्येक मिनिटाला दुखापतीचे निरीक्षण केले जाईल.”
जर रोहित शर्माला आगामी कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर, त्याच्याऐवजी पृथ्वी शॉ किंवा मयंक अगरवालला केएल राहुल सोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. रोहितने या मालिकेत ५२.५७ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या आहेत. रोहितने चौथ्या कसोटी सामन्यात भारताबाहेर पहिले वहिले शतक झळकावले होते. तसेच मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो रूटनंतर दुसरा फलंदाज आहे.
भारतीय संघाचा १५७ धावांनी दणदणीत विजय
भारतीय संघाने दिलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी अर्धशतकं झळकावले होते. परंतु, ते दोघेही अर्धशतकांचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर कर्णधार जो रूट देखील स्वस्तात माघारी परतला होता. तसेच इंग्लंड संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २१० धावांवर गुंडाळला होता. यासह भारतीय संघाने या सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल पदार्पणासाठी ‘हे’ सात खेळाडू आहेत सज्ज; १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात झालेत सामील
नडला त्याला तोडला! पुजाराला डोळे दाखवणाऱ्या ओव्हरटनचा उमेश यादवने ‘असा’ घेतला बदला
कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण