सध्या भारत आणि इंग्लंड संघादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येते आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या चेन्नईच्या खेळपट्टीवर इंग्लंडने धावांचा रतीब घातला आहे. दुसऱ्या दिवसाखेर त्यांच्या ८ बाद ५५५ धावा झाल्या आहेत.
मात्र याच दरम्यान एक मजेशीर घटना घडल्याचे पाहायला मिळाले. भारतीय गोलंदाजांना विकेट मिळत नसल्याचे पाहून कर्णधार विराट कोहलीने कामचलाऊ गोलंदाज रोहित शर्माकडे चेंडू सोपवला. मात्र यावेळी चक्क रोहित माजी भारतीय गोलंदाज हरभजन सिंगच्या अॅक्शनची नक्कल करताना दिसून आला.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जो रुट व आॅली पोप फलंदाजी करत असताना दुसरे सत्र संपायला थोडासाच वेळ बाकी होता. त्यामुळे रोहित गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी रोहितने मजेशीर रित्या हरभजनच्या गोलंदाजीची नक्कल करत चेंडू टाकला. रोहितने हा चेंडू टाकल्यानंतर समालोचन कक्षात तसेच खेळाडूंमध्ये देखील काहीशा प्रमाणात हशा पिकली होती. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, क्रिकेट फॅन्स देखील त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
https://twitter.com/vishalghandat1/status/1357973161308901384
दरम्यान सामन्याचा विचार केला असता दुसरा दिवस देखील गाजवला तो इंग्लंडचा कर्णधार जो रुटने. रुटने 377 चेंडूत 19 चौकार व 2 षटकारासह 218 धावांची शानदार खेळी केली. रुट त्रिशतक झळकावणार अशी शक्यता वाटत असतानाच शाहबाज नदीमने त्याला बाद केले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 180 षटकात 8 गडी गमावत 555 धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
नासिर हुसेन यांनी उधळली जो रूटवर स्तुतिसुमने, म्हणाले
कोणाचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम? आयसीसीने घेतलेल्या पोलमध्ये या खेळाडूला मिळाली सर्वाधिक मते
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ