बीसीसीआयनं आगामी क्रिकेट हंगामासाठी करार करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळण्यात आलंय. हे दोघंही देशांतर्गत क्रिकेट खेळले नव्हते, त्यामुळे बोर्डानं हा कठोर निर्णय घेतला.
बीसीसीआयनं आपल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितलं की, श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे कराराचा भाग नाहीत. तसेच भारताच्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यावं लागेल. धरमशाला येथे होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं देखील यावर भर दिला आहे. (rohit sharma press conference)
“जेव्हा खेळाडू उपलब्ध असतील तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळावं. त्यांना वैद्यकीय पथकाकडून काही सल्ला मिळाला असेल तरच विश्रांती घ्यावी. हे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी लागू आहे. आपण देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देणं गरजेचं आहे, कारण हाच भारतीय क्रिकेटचा गाभा आहे”, असं रोहितनं नमूद केलं.
श्रेयस अय्यर रणजी स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. दुखापतीमुळे तो रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्याला मुकला होता. मात्र, अय्यर तंदुरुस्त असल्याचं एनसीएनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, यानंतर त्यानं उपांत्य फेरीच्या सामन्यात भाग घेतला होता. श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना आता टीम इंडियाकडून पुन्हा खेळायचं असल्यास त्यांना देशांतर्गत क्रिकेटकडे परतावं लागेल. याबाबतीत बीसीसीआयची भूमिका अत्यंत कठोर आहे. देशांतर्गत क्रिकेटचा विकास व्हावा यासाठी बीसीसीआय अशी भूमिका घेत असल्याचं बोललं जातंय.
धरमशालाच्या मैदानावर आतापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला गेला आहे. 2017 मध्ये भारतानं येथे ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवनं पदार्पणातच चार बळी घेतले होते. तर रवींद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारनं गौरवण्यात आलं होतं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, तेव्हाच्या संघातील फक्त तीन खेळाडू (रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव) आताच्या संघात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये ‘सूर्या’ तळपणार! शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सुरू केली बॅटिंग
धरमशाला कसोटीत इंद्रदेव येईल ‘साहेबां’च्या मदतीला? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
‘झहीर-धोनीही 100 कसोटी सामने खेळू शकले असते, परंतु…’; आर अश्विनचा मोठा दावा