वनडे विश्वचषक जिंकण्याचे रोहित शर्मा याचे स्वप्न यावर्षी अपूर्णच राहिले. रोहितच्या वनडे कारकिर्दीतील कदाचित हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. असे असले तरी, रोहित शर्मा आणि विराट कोहली 2024 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक देशासाठी जिंकतील, अशा चर्चा चाहत्यांमध्ये पाहायला मिळतात. पण आता चाहत्यांची निराशा करणारी एक बातमी समोर येत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यापुढे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच न दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहितने वनडे विश्वचषक 2023 सुरू होण्याआधीच याबाबत निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. रोहितने 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. दरम्यानच्या काळात हार्दिक पंड्या यानेच टी-20 संघाचे नेतृत्व केले, हेदेखील चाहत्यांनी पाहिले. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून रोहितच्या टी-20 कारकिर्दीबाबत महत्वाची माहिती दिली गेली आहे.
“हे अचानक घडले नाहीये. मागच्या एका वर्षात रोहितने एकही टी-20 सामना खेळला नाहीये. वनडे विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने असे केले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी रोहितने यासंदर्भात विस्तृत चर्चा केली होती. त्याने स्वतः अशी इच्छा व्यक्त केली होती. हा पूर्णपणे रोहितचा निर्णय होता,” अशी माहिती या बीसीसीआय अधिकाऱ्याकडून दिली गेली.
आता अशा बातम्या समोर येत आहेत, की आगामी वनडे विश्वचषकात देखील रोहित न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाकडे शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड अशा गुणवंत सलामीवीरांचे पर्याय आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी (23 नोव्हेंबर) रोजी सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा विश्रांतीवर आहे. रोहितच्या अनुपस्थितीत युवा सलामीवीर अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाही, तर संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माशी चर्चा करू शकतात.
रोहित सध्या 36 वर्षांचा असून तिन्ही क्रिकेट प्रकारांसह प्रत्येक वर्षी इंडियन प्रीमियर लीग खेळणे त्याच्यासाठी जवळपास अशक्य दिसते. याच कारणास्तव मागच्या दोन वर्षांमध्ये संघातील वरिष्ठ खेळाडूंना अनेकदा विश्रांती दिल्याचे पाहायला मिळते. येत्या काळात रोहित कसोटी क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी टी-20 क्रिकेटपासून लांबच राहण्याची पूर्ण शक्यता आहे. (Rohit Sharma will stay away from T20 international cricket in the coming period)
महत्वाच्या बातम्या –
CWC 2023 । ‘खेळाडू अस्वस्थ वाटत होते’, मोदींचा ड्रेसिंग रुम भेटीवर जोरदार टीका
विश्वचषक पराभवानंतर सौरव गांगुलीकडे मोठी जबाबदारी, करणार ‘हे’ काम