इंग्लंडचा माजी कर्णधार माईक एथर्टन याचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने गेल्या वर्षी कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान त्याच्या फलंदाजी तंत्रावर काम केले होते. याचाच त्याला सध्या फायदा होत आहे. यावर्षी ३० वर्षीय रूट कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. शनिवारी (१४ ऑगस्ट) त्याने लॉर्ड्सवर भारताविरुद्ध मालिकेतील दुसरे शतक झळकावले आणि १८० धावांवर नाबाद राहिल्याने इंग्लंडने २७ धावांची आघाडी घेतली.
एथर्टनने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, “मला वाटते की, त्याने लॉकडाऊनदरम्यान त्याच्या फलंदाजीवर काही चांगले काम केले आहे. त्याचा फायदा त्याला आता भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळत आहे. हे सर्व घडले तेव्हा तो २९ वर्षांचा होता आणि त्याची कारकीर्द उत्तम चालली होती. पण लॉकडाऊनने त्याला विश्रांतीची संधी दिली. यावेळी रूटने म्हटले होते की, आता माझ्या कारकीर्दीचा दुसरा भाग येत आहे. यानंतर मी एका शानदार खेळाडूपासून एक सार्वकालिन महान खेळाडू बनू शकतो.”
लॉर्ड्स कसोटीतील शतकासह रूटने कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडचे माजी कर्णधार ते क्रिकेट लेखक बनलेले एथर्टन म्हणाले, “लॉकजाऊनच्या काळात त्याने फलंदाजी विश्लेषकाला, तो गेल्या पाच वर्षांपासून ज्या पद्धतीने बाद झाला आहे; त्याचे व्हिडिओ पाठवण्यास सांगितले होते. त्याने त्या व्हिडिओंना बारकाईने पाहिले आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याचे फळही आता मिळत आहेत.”
तो म्हणाला की, “त्याने आता त्याच्या फलंदाजी शैलीत थोडा तांत्रिक बदल केला आहे आणि फलंदाजी करताना तो त्याचा मागचा पाय सरळ मागे ठेवतो. यामुळे त्याला एलबीडब्ल्यू बाहेर पडण्याची शक्यता कमी होते. गेली तीन वर्षे तो सीम आणि वेगवान गोलंदाजीच्या विरोधात मायभूमीत सर्वोत्तम फलंदाजी करत आहे. पण तो आता त्याच्या सर्वश्रेष्ट स्वरूपात आहे.”
“सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला कर्णधारपद आणि अपेक्षांचे ओझे वाटत नाही. फक्त हा डाव पाहा, तो फलंदाजीला आला होता. तेव्हा भारताने इंग्लंडचे दोन चेंडूंत दोन बळी घेतले होते आणि तो हॅट्रिक चेंडू होता. जो रूट ‘द बॅट्समन’ आहे, जो रूट ‘द कॅप्टन’ नाही; जो अपेक्षा आणि दबावाने दडपून खेळत नाही तर तो पूर्ण स्वातंत्र्याने खेळतो,” असे शेवटी त्याने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे क्रिकेटचे पीच आहे, तुमच्या घराचे अंगण नाही’, अँडरसनवर भडकला कर्णधार कोहली
अँडरसनला बाउंसर टाकलेले पाहून डेल स्टेन म्हणाला, “बुमराह जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा…”