क्रिकेटविश्वाला अनेक दिग्गज गोलंदाजांचा वारसा लाभला आहे. असे अनेक गोलंदाज होऊन गेले जे आपल्या रिव्हर्स स्विंग आणि वेगवान गोलंदाजीने फलंदाजांच्या अडचणीत भर पाडायचे. एका रिव्हर्स स्विंग गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासमोर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारखे दिग्गज फलंदाजदेखील अडचणीत सापडले होते. न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ख्रिस केर्न्स याने आपल्या रिव्हर्स स्विंगने या दिग्गज खेळाडूंना अडचणीत टाकले होते. परंतु मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने एक युक्ती लढवली होती, ज्यानंतर ख्रिसच्या गोलंदाजीवर त्यांनी दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पडायला सुरुवात झाली होती.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मोहालीच्या मैदानावर रंगतदार सामना रंगला होता. या सामन्यात सचिन आणि द्रविड यांच्या जोडीला ख्रिस केर्न्स याच्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीसमोर खेळणे कठीण जात होते. कारण ख्रिस केर्न्स गोलंदाजीसाठी धावत येत असताना चेंडू लपवत होता. परिणामी फलंदाजांना अंदाज येत नव्हता की चेंडूचा चमकदार भाग कुठल्या बाजूला आहे.
सचिनने काढला होता रिव्हर्स स्विंगचा तोड
सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे की, कशाप्रकारे सचिनने त्याच्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीचा तोड शोधून काढला होता. त्याने ही योजना राहुल द्रविडलाही सांगितली होती. तो म्हणाला, “मी नॉन स्ट्राईकवर असताना बघणार की चेंडूची चमकदार बाजू कुठल्या दिशेने आहे. ज्या दिशेने चेंडूची चमकदार बाजू असेल. मी त्या हातात बॅट पकडेल.”
राहुल द्रविडलाही हे मान्य होते. राहुलनेही गोलंदाजाला नव्हे तर सचिनच्या हाताकडे बघायला सुरुवात केली होती. त्यानंतर राहुल द्रविडलाही ख्रिस केर्न्सचे चेंडू समजायला लागले आणि त्यांनी चौकार-षटकार मारायला सुरुवात केली. हे पाहून सर्वच न्यूझीलंडचे खेळाडू आश्चर्यचकित झाले होते. गोलंदाजालाही प्रश्न पडला होता की, अचानक हे सहजरीत्या रिव्हर्स स्विंग कसे काय खेळत आहेत.
त्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना जाणवले की, सचिन सतत गोलंदाजाचा हात पाहून राहुल द्रविडला इशारा करत आहे. त्यानंतर केर्न्सने क्रॉस सीम चेंडू पकडुन भेदक मारा करायला सुरुवात केली होती. पुढे केर्न्स गोलंदाजी करता करता थांबला आणि त्याने सचिनला विचारले की, आता कोणता इशारा देशील? सचिनने याचा देखील तोड शोधून काढला होता.
“जर मला चेंडू कुठला आहे, हे माहीत नसेल तर मी बॅट दोन्ही पायांच्या मध्ये ठेवतो,” या शब्दात सचिनने त्या सामन्यातील फटकेबाजीमागची युक्ती सांगितली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताकडून १०२ सामने खेळलेल्या ‘या’ फिरकीपटूने सांगितले, कोणता संघ जिंकेल WTC अंतिम सामना?
जेव्हा सेहवागने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा, २ चेंडूत २१ धावा चोपण्याचा केलता करिश्मा
आई-वडिलांचे स्वप्न होते डॉक्टर बनवण्याचे, पण ‘हा’ खेळाडू बनला घातक फिरकीपटू