क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यानं अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. सचिन तेंडुलकरच्या असंख्य विक्रमांपैकी एक म्हणजे त्याचा 100 शतकांचा विक्रम. सचिननं आपल्या कारकिर्दीत कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण 100 शतकं झळकावली आहेत. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला या विक्रमाच्या आसपासही पोहचता आलेलं नाही.
सचिन तेंडुलकरचं शंभरावं शतक तर सर्वांनाच आठवत असेल. बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात त्यानं हे शतक झळकावलं होतं. आशिया चषक 2012 मध्ये मीरपूर येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला जात होता. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि गौतम गंभीरची विकेट लवकर पडली. यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी उत्कृष्ट भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात परत आणलं.
या सामन्यात सचिन तेंडुलकरनं 147 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 114 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 100 वं शतक होतं. यासह 100 शतकं ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. या विक्रमाच्या बाबतीत त्याच्या आसपास दुसरा कुठलाही क्रिकेटर नाही.
सचिन तेंडुलकरनं 1994 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं एकदिवसीय शतक झळकावले होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिंगर वर्ल्ड सीरिजचा तिसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कोलंबोत आला होता. तोपर्यंत सचिन तेंडुलकर सलामीला येत असे. त्या सामन्यात त्यानं उत्कृष्ट शतक झळकावलं. 18 वर्षांनंतर मिरपूरमध्ये त्यानं कारकिर्दीतील 100 वं शतक झळकावलं.
सध्या फक्त विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांच्या जवळ आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८० शतकं आहेत. तो तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो, असा विश्वास अनेक दिग्गजांना वाटतो. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग आहे, ज्याच्या नावे एकूण 71 शतकं आहेत. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे कुमार संगकारा (63) आणि जॅक कॅलिस (62) आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’ची बॅट दोन वर्षांपासून शांतच! धोनीनं आयपीएलमध्ये शेवटचं अर्धशतक कधी झळकावलं होतं?
आयपीएलचा सर्वात कंजूस गोलंदाज कोण? सर्वाधिक निर्धाव षटकं कोणी टाकली आहेत?
“बीसीसीआयनं रणजी खेळाडूंच्या मानधनात तिप्पटीनं वाढ करावी”, सुनील गावसकर यांची मागणी