प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा हा ऐतिहासिक सामना एजबॅस्टन येथील रोज बाऊल स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, अनेक माजी क्रिकेटपटू आपापली मते व्यक्त करताना दिसून येत आहेत. सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना एक सल्ला दिला आहे.
या गोलंदाजापासून न्यूझीलंडला सावध राहावे लागेल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रमांचा धनी व दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी एका मुलाखतीत अनेक विषयांवर आपली मते मांडली. त्याने यादरम्यान न्यूझीलंड संघाला भारताच्या जसप्रीत बुमराह याच्यापासून सावध राहावे लागेल, असे म्हटले.
सचिनने सांगितले, “जसप्रीत बुमराह एक दर्जेदार गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजीची शैली काहीशी निराळी असली तरी त्याचा सामना करणे अवघड जाते. तो अगदीच युवा असताना मी नेटमध्ये त्याचा सामना केला होता. त्याने टाकलेला चेंडू जोरात येऊन बॅटवर लागतो. त्यामुळे आपल्याला प्रतिक्रिया देताना उशीर होतो. न्यूझीलंडला त्याच्यापासून सावध राहावे लागेल.”
याच मुद्द्याला धरून सचिनने पुढे म्हटले, “कोण्या फलंदाजाला सल्ला द्यायचा झाल्यास मी म्हणेल की, सर्वप्रथम त्याने चेंडूवर आपली नजर बसवली पाहिजे. त्यानंतरच मोठा फटका खेळण्याची तयारी करावी. नजर बसलेले फलंदाज अप्रतिम कामगिरी केलेले दिसतात. तुम्ही मैदानावर वेळ घालवल्यास, गोलंदाजाच्या शैलीचा अभ्यास केल्यास धावा बनविण्यास सोपे जाते.”
जसप्रीत बुमराह याने आपल्या लहानशा कारकिर्दीत केवळ १९ कसोटी सामने खेळले असून, यामध्ये त्याला ८३ बळी घेण्यात यश आले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याच्याकडून भारतीय संघाला मोठी अपेक्षा असेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल आणि पीएसएलीची तुलनेबद्दल राशिद खानने दिलेले उत्तर ऐकून व्हाल खूश
दिग्गज गोलंदाजाने निवडला अंतिम सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ, सिराजला वगळून इशांतला दिले स्थान