सलीम अझीझ दुरानी. जन्म अफगाणिस्तानचा. इंटरनॅशनल क्रिकेट खेळले भारतासाठी. एखाद्या हिरोसारखी पर्सनॅलिटी. निळे डोळे, एक चांगली बॉडी, नेहमी कॉलर वर, कुठेही जा चाहत्यांचा गराडा पडलाच म्हणून समजा. फीमेल फॅन्समध्ये तर तुफान लोकप्रिय. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर क्रश, आणि सर्वात मोठी खासियत म्हणजे ऑन डिमांड सिक्स मारण्याची क्षमता. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि शानदार खेळाडू असलेल्या त्याच सलीम दुरानी यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश.
सलीम दुरानी (Salim Durani) हे खेळाडू आणि व्यक्ती म्हणून जितके विलक्षण आहेत तितकीच विलक्षण त्यांच्या जन्माची कहाणी. त्यांचे कुटुंब काबूल ते खैबर असा प्रवास करत असतानाच त्यांच्या आईने त्यांना जन्म दिला. वडिलांना अतिआनंद झाला. त्यांच्या वडिलांकडे त्यावेळी एक क्रिकेट बॅट होती, त्यांनी तीच बॅट सलीम यांच्या समोरून फिरवली आणि मोठ्याने घोषणा केली की, “एका इंटरनॅशनल क्रिकेटरने आता जन्म घेतला आहे.”
त्यांचे वडील अब्दुल यांनी अगदी त्या क्षणापासूनच मुलाला क्रिकेटर बनवायचा ध्यास घेतला. सलीम तीन वर्षाचे झाले असताना संपूर्ण दुरानी कुटुंब गुजरातच्या जामनगरला येऊन स्थायिक झाले. व्यवसाय करू लागले. सलीम 14 वर्षांचे असतील तेव्हा फाळणी झाली. अब्दुल दुरानी यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. ते पोहोचलेही मात्र मुलगा सलीम इथेच राहिला. अब्दुल यांचे स्वप्न मात्र जामनगरमधील त्यांच्या इतर नातेवाईकांनी पूर्ण करण्याचे ठरवले.
अब्दुल दुरानींचे क्रिकेटवर प्रेम किती होते ते पाहा. आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचं त्यांनी स्वप्न पाहिलं, पण तो भारतात राहिला. कराचीत गेल्यावर त्यांना तिथल्या मुलांमध्ये आपला सलीम दिसू लागला. कराचीत ते मुलांना क्रिकेटची ट्रेनिंग देत. त्यांनी घडवलेले रत्न म्हणजे पाकिस्तानचे पहिले क्रिकेटिंग सुपरस्टार मोहम्मद हनीफ.
सन 1953पासून सलीम हे सौराष्ट्रासाठी क्रिकेट खेळू लागले. स्टायलिश आणि तितकीच आक्रमक लेफ्ट हॅन्ड बॅटिंग. पुढचे दोन वर्ष गुजरातसाठी आणि त्यानंतर कायमस्वरूपी राजस्थानसाठी खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1960रोजी टीम इंडियासाठी खेळायचं त्यांचं स्वप्न साकार झाले. अब्दुल दुरानींचे ते शब्द खरे ठरले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू केला. 1961मध्ये अब्दुल दुरानी आपल्या लेकाचा खेळ पाहण्यासाठी कोलकात्याला आले. तीच त्या दोघांची अखेरची भेट! याच सीरिजमधील कोलकाता आणि मद्रास टेस्टमध्ये त्यांनी अफाट कामगिरी करत भारताला पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध सीरिज जिंकून दिलेली.
सलीम दुरानी अल्पावधीतच तुफान लोकप्रिय झाले. एकतर त्यांची पर्सनॅलिटी आणि दुसरी म्हणजे ऑन डिमांड सिक्स मारण्याची काबिलियत. स्टेडियमच्या ज्या कोपऱ्यातून आवाज येईल तिथे त्यांचा सिक्स असायचा. लहानपणापासूनच आपण असे खेळत आल्याचे दुरानी सांगतात. दुरानी यांची क्रेझ कोणत्या लेव्हलला होती त्याचे एक उदाहरण 1973 साली दिसून आले. त्यावेळी दुरानी यांच्याशिवाय टीम इंडियाची कल्पनाच केली जात नसायची. ते आपल्या रिटायरमेंटच्या जवळ आले होते. कानपूर येथे एक टेस्ट होणार होती. अचानकपणे प्रेक्षकांना समजले की, दुरानी यांना संघात निवडले गेले नाहीत. त्यावर एकच हल्लकल्लोळ माजला. कानपूरच्या रस्त्यांपासून स्टेडियमपर्यंत “नो दुरानी नो टेस्ट” अशा प्रकारचे बोर्ड झळकू लागले.
दुरानी 1973 मध्येच रिटायर झाले. मात्र, त्याच्या दोन वर्ष आधी वेस्ट इंडीजला वेस्ट इंडीजमध्ये टेस्ट सीरिज हरवण्याचा कारनामा टीम इंडियाने केलेला. टीम इंडियाने जिंकलेल्या त्या पोर्ट ऑफ स्पेन टेस्टमध्ये क्लाइव्ह लॉईड व सर गॅरी सोबर्स यांना लागोपाठ आऊट करून त्यांनी विजयाचा मार्ग खुला केलेला. रिटायरमेंटनंतर लगेचच त्यावेळची लाखो दिलो की धडकन असलेल्या परवीन बाबीसोबत त्यांनी चरित्र चित्रपटात अभिनय केला. त्यावेळी 18 हजारांचे मानधन त्यांना मिळाल्याचे ते सांगतात.
सलीम दुरानी हे अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटर. त्या अर्जुन पुरस्काराचा देखील एक असाच किस्सा आहे. 1962 मध्ये त्यांना हा पुरस्कार घोषित झाला. त्यावेळी ते वेस्ट इंडीजमध्ये खेळत असल्याने पुरस्कार समारंभात पोहोचले नाहीत. पुढे भारत सरकार विसरूनच गेले की, त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. पुढे तब्बल 47 वर्षानंतर म्हणजे 2009 मध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार दिला गेला. त्यांचे जन्मस्थान असलेल्या अफगाणिस्तानने जेव्हा आपल्या इतिहासातील पहिली टेस्ट बेंगलोर येथे खेळली, तेव्हा बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना खास सन्मानित केले.
Happy 86th birthday to former India all-rounder Salim Durani 🍰
He was the highest wicket-taker in 🇮🇳's 2-0 triumph over England in the 1961/62 Test series with 23 scalps 🔥 pic.twitter.com/Z0EwCbxPXD
— ICC (@ICC) December 11, 2020
आकडेवारीचा विचार करायचा झाला, तर सलीम दुरानी हे दिग्गज म्हणून गणले जाणार नाहीत. मात्र, त्यांचा सहवास लाभलेले खेळाडू आणि लोक सांगतात की, ते एक क्रिकेटर आणि त्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून खूप महान आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि भर कॅफेत वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांनी गल्लीतल्या पोरांसारखी केली भांडणे
अबब! सामना शुल्क सारखे, तरीही विराट-रोहितच्या वार्षिक पगाराच्या तुलनेत स्मृती-हरमनचा पगार झोप उडवणारा