भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्याची सुरूवात उत्तम करण्याच्या प्रयत्नाला पावसाने अडथळा निर्माण केला. चेस्टर ले स्ट्रीट येथे खेळला गेलेला पहिला टी २० सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या सामन्यामुळे दोन भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान उभे केले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने या सामन्यात विलक्षण कामगिरी केली. त्याने ४ षटकांत ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर यांना बाद केले.
साकिबचा संजू आणि तिलक यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० विक्रम जबरदस्त आहे. जेव्हा हे दोन फलंदाज क्रीजवर येतात तेव्हा ते दोघेही साकिबसमोर शरणागती पत्करतात. (Saqib Mahmood performance against Sanju Samson and Tilak Varma in T 20 match)
संजूसाठी तर साकिब एखाद्या कोड्यासारखेच आहे, जे त्याला अद्याप सोडवता आलेले नाही. या दौऱ्यातील पहिल्याच टी२० सामन्यात साकिबने त्याला एका धावेवर बाद केले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये हे दोघे दुसऱ्यांदा समोरा-समोर आले आणि दोन्ही वेळा साकिबने संजूला बाद केले. या दोन डावादरम्यान संजूने साकिबचे ५ चेंडू खेळले आणि एकही धाव काढली नाही.
तिलक आणि साकिब यांचेही समीकरण काहीसे संजूप्रमाणेच आहे. तो ही बुधवारी (१ जुलै) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात साकिबचा शिकार ठरला. तो १३ चेंडूत १३ धावा करत बाद झाला. धक्कादायक बाब म्हणजे, तिलकने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये साकिबच्या केवळ ३ चेंडूंचा सामना केला. त्यामधील एका चेंडूवर एक धाव घेतली आणि उर्वरित दोन चेंडूंवर विकेट्स गमावली.
सामन्याची स्थिती पाहिली तर भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. कर्णधार अय्यर आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या. भारताचा डाव संपल्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि सामना अनिर्णीत राहिला.
या मालिकेत पुढील सामना ४ जुलैला खेळला जाणार असून संजू आणि तिलकला साकिबच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी उत्तम मार्ग शोधावा लागेल.





