भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिका पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांमध्ये केवळ उत्सुकताच नाही, तर सामन्यांच्या वेगवेगळ्या (IND vs ENG Timing) वेळांबाबतही गोंधळ निर्माण झाला आहे. या पाच सामन्यांपैकी काही सामने रात्री 10 वाजता, तर काही सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता दुसऱ्या टी-20 सामन्याची उत्सुकता वाढली आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना (IND vs ENG 2nd T20) मँचेस्टर येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) फ्लडलाइट्सखाली खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्यांची सुरुवात एक तास आधी करण्याचा निर्णय घेतला होता. टेलिव्हिजनवरील प्रेक्षकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता.
त्यामुळे पहिला, तिसरा आणि चौथा टी-20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होणार आहे, तर दुसरा आणि पाचवा सामना संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 4 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणार असून तिसरा सामना (India England T20 Schedule) 7 जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे 9 जुलै आणि 11 जुलै रोजी ब्रिस्टल आणि साऊथम्प्टन येथे होणार आहे.
बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा (59) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (68) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 189 धावा केल्या. मात्र, मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत 0-2 असा पराभव होण्यामागे खराब फलंदाजी हे मुख्य कारण होते. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी केलेली खेळी भारतीय संघासाठी सकारात्मक बाब ठरली. मात्र, डावांमधील विश्रांतीदरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे इंग्लंडचा डाव सुरूच होऊ शकला नाही. पाच षटकांचा सामना होण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतिम वेळेपूर्वी 40 मिनिटांहून अधिक वेळ शिल्लक असतानाच पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.






