भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. परंतु बऱ्याचदा नेतृत्त्वपदावरुन त्याच्यावर टिका केली जाते. मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा विराटच्या जागी भारतीय संघाचा कर्णधार असावा अशी मागणी सातत्याने होत असते.
यामागचे मुख्य कारण म्हणजे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). विराट आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार आहे, ज्यांनी आजवर एकदाही जेतेपद पटकावले नाही. तर रोहित हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा संघनायक आहे, ज्यांनी विक्रमतोड पाच वेळा आयपीएल चषक उंचावला आहे.
आता या मुद्द्याबद्दल भारतीय संघाचे माजी निवडकर्ता सरनदिप सिंग यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांनी रोहितला पाठिंबा न देता विराटचे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भारतीय संघाला वेगवेगळ्या कर्णधारांची गरज नाही. विराट सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमधील आपल्या फ्रँचायझीला विजेतेपद जिंकवून न देऊ शकल्याने त्याला भारतीय संघाच्या नेतृत्त्वपदावरुन हटवले जाऊ शकत नाही.
न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना सरनदिप सिंग म्हणाले की, “कोणत्याही संघाला वेगवेगळ्या कर्णधाराची गरज तेव्हा भासते जेव्हा त्यांचा कर्णधार चांगले प्रदर्शन करत नसेल. जर विराट एखाद्याही स्वरुपात साजेशी कामगिरी करु शकला नसता; तर तुम्ही त्याच्या हातून नेतृत्त्वाची सूत्रे काढून घेत त्याचा दबाव कमी करु शकला असता. परंतु विराट हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात ५० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.”
“जर केवळ आयपीएलचा चषक जिंकू न शकल्याने तुम्ही त्याची नेतृत्त्वापदावरुन हकालपट्टी करा म्हणत असाल, तर असे होणे अशक्य आहे. तो भारतीय संघाचा सर्वात तंदुरुस्त खेळाडू आणि कर्णधार आहे. विराटच्या अनुपस्थित रोहित काही काळ संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पेलवू शकतो. परंतु तो कायमची विराटची जागा घेऊ शकत नाही,” असे शेवटी सरनदिप सिंग म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा! आयपीएल २०२१ मधून बाहेर झालेला श्रेयस अय्यर, घरबसल्या कमावणार ‘इतके’ कोटी
डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर यष्टीरक्षकाने चपळाईने केली फलंदाजाची बत्ती गुल, बघा भन्नाट व्हिडिओ
प्रशिक्षक ते डायरेक्टर ऑफ क्रिकेट; सर्व आयपीएल फ्रँचायझींचा सपोर्ट स्टाफ माहितीय का? पाहा