दोन वर्षानंतर सजलेले रणजीचे रण समाप्त झाले. सहा वर्षानंतर फायनलमध्ये आलेले रणजी जायंट मुंबई आणि 23 वर्षानंतर डोमेस्टिक क्रिकेटमधील सर्वात मोठी मॅच खेळायला उतरलेली मध्य प्रदेश यांच्यात ही फायनल चांगलीच रंगली. मुंबई फेवरेट असतानाही जिद्दी मध्य प्रदेशने टीम गेम दाखवला, आणि आपले रणजी ट्रॉफीचे स्वप्न पूर्ण केले. चॅम्पियन मध्य प्रदेश झाली असली, तरी संपूर्ण सीजनमध्ये ज्या एका खेळाडूवरून कोणाचीच नजर हटली नाही, तो म्हणजे मुंबईचा सरफराज खान. मागच्या दोन रणजी सिझनपासून स्वप्नवत फॉर्ममध्ये असलेल्या सरफराजने यावेळी अशी काही बॅटिंग केलीये की, त्याला थेट इंडियाचा ब्रॅडमन म्हणू लागलेत. चक्क ब्रॅडमन यांच्याशी तुलना होतेय, अशी नक्की काय कामगिरी सरफराजने करून दाखवलीय.
सरफराज खान (Sarfaraz Khan) हे नाव क्रिकेट जगताला नवं नाही. बाराव्या वर्षी मुंबईच्या प्रसिद्ध हॅरीस शिल्ड ट्रॉफीत आपल्या रिझवी स्प्रिंगडेल शाळेकडून खेळताना 421 बॉलमध्ये 439 रन करत क्रिकेटचा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा 45 वर्ष जुना विक्रम मोडलेला. त्यावेळी त्याचे अमाप कौतुक झाले. पुढे लवकरच तो मुंबईच्या आणि त्यानंतर भारताच्या अंडर नाईन्टीन टीमकडून खेळला. इंटरनॅशनल लेवलला त्याची ओळख झाली आयपीएलमधून. 2015 ला आरसीबीच्या टीममध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यासारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज असताना सरफराज भाव खाऊन गेलेला. फिनिशर म्हणून त्याने काही मॅचेसमध्ये जबरदस्त बॅटिंग करून दाखवली. इतकंच काय द विराट कोहली त्याच्यापुढे नतमस्तक झाला. इथपर्यंत सार सुरळीत सुरू होतं.
मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवून मुंबईसाठीच दोन रणजी सिझन खेळत त्याने उत्तर प्रदेशची वाट धरली. खरंतर उत्तर प्रदेशच त्याची जन्मभूमी. त्याचे वडील नौशाद मुंबईत कोचिंग करायचे म्हणून कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. उत्तर प्रदेशसाठी खेळायला सुरुवात केल्यावर मात्र त्याचा फॉर्मच गेला. विराटनेही फिटनेसच्या कारणामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. सगळा कार्यक्रम गंडतोय म्हंटल्यावर त्याने मुकाट्याने मुंबईचे तिकीट काढले. मात्र, नियमानुसार त्याला एक वर्ष मुंबईसाठी खेळता येणार नव्हते. याच कुलिंग पीरियडच्या काळात त्याने आणखी मेहनत घेतली. वडिलांनी घरीच नेट्स लावले आणि तदनंतर सरफराज 2.0 पाहायला मिळाला 2019-2020 च्या रणजी ट्रॉफीत.
त्याने मुंबईसाठी खेळायला सुरुवात केली आणि खेळतच राहिला. असा तुफान फॉर्म पकडला की, त्याला थांबवणं शक्य होईना. शतक ठोकायचा तीही डॅडी हंड्रेड. ट्रिपल सेंचुरीही त्याच्या नावे आली. सिझन संपला तेव्हा सरफराजच्या नावावर 6 मॅचमध्ये होते 928 रन्स. ऍवरेज 154.66 होय, 154.66. ज्याप्रकारे आयपीएलमध्ये तो वन सिझन वंडर म्हणून ओळखला गेला, तसाच रणजीमध्ये होतो का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशात कोविडमूळे पुढचा रणजी सिझनच कॅन्सल झाला. मात्र सरफराजने या वेळेचा सदुपयोग केला. आणखी मेहनत घेतली आणि जेव्हा केव्हा क्रिकेट सुरू होईल, तेव्हा आणखी जोमाने उतरायची तयारी केली.
सन 2022मध्ये रणजी सिझन सुरू झाला आणि सरफराज पुन्हा मैदानात उतरला. पहिली मॅच डिफेंडींग चॅम्पियन सौराष्ट्रविरुद्ध. इथं सरफराजने मौका साधला आणि खेळली पावणे तीनशे रनांची इनिंग. त्यानंतर गोव्याविरुद्ध एक फिफ्टी. ओडीसाविरुद्धही 165 रन करून आपला ड्रीम फॉर्म कायम ठेवला. रणजीची लीग स्टेज संपली आणि सरफराज हायेस्ट रनस्कोररमध्ये टॉपवर होता. आयपीएल आली आणि दिल्लीकडून तो बरा खेळला. आयपीएल समाप्तीनंतर अवघ्या चारच दिवसात रणजी नॉट आऊट राऊंड सुरू झाला. उत्तराखंड विरुद्धच्या या क्वार्टर फायनलमध्ये त्याने पुन्हा दीडशतक झळकावले. त्या मॅचला मुंबईने 725 रन्सने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला. सेमीफायनललाही त्याच्या बॅटमधून रन्स आले. सीझनची सुरुवात पावणेतीनशेने केलेल्या सरफराजने सीझनचा एंड फायनलमध्ये 134 रन्सच्या इनिंगने केला. मुंबई फायनलमध्ये हरली पण सरफराज मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिला. सीझनचा हायेस्ट रन स्कोरर. 6 मॅच 928 रन्स आणि ऍवरेज 122.75 सलग दुसऱ्या सीझनमध्ये 900+ रन्स करणारा केवळ दुसरा बॅटर.
आता इतक्या स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे म्हटल्यावर रेकॉर्ड तर बनणारंच. इतर बरेच रेकॉर्ड बनले, पण ज्या रेकॉर्डची दखल आयसीसीला घ्यायला भाग पडली तो म्हणजे त्याच्या ऍवरेजचा रेकॉर्ड. या कामगिरीनंतर त्याच वर्षी अवघ्या 25 फर्स्ट क्लास मॅचच करीयर, 2530 रन्स आणि ऍवरेज 81.61 साक्षात क्रिकेटचे डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरच सर्वोत्तम फर्स्ट क्लास ऍवरेज. ब्रँडमन यांच ऍवरेज 99.96. इथपर्यंत पोहचणे जवळपास अशक्यप्राय आहे. मात्र, पंचविशीतील सरफराजने जिथपर्यंत मजल मारली आहे, ते पाहून ‘भारताचा ब्रॅडमन’ ही त्याला दिलेली उपाधी सध्या तरी योग्यच आहे, असे म्हणायला हरकत नाही.सलग दोन सिझन गाजवल्यानंतर आता सरफराजला टीम इंडियात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. सध्या त्याच्या प्रथम श्रेणीच्या 37 सामन्यात 79.65च्या सरासरीने 3505 धावा आहेत. यामध्ये 13 शतकांचाही समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतातील सर्वात महागडे अन् यशस्वी कोच चंद्रकांत पंडित, ‘या’ संघाला विजयी बनवण्यासाठी मोजलेले दीड कोटी
शतक ठोकल्यानंतर चंदू बोर्डेंना ‘या’ 3 दिग्गजांनी खांद्यावर घेतलेलं उचलून, पंतप्रधानांचाही समावेश