मुंबई:- शिवशक्ती महिला संघाने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी डॉ. शिरोडकरचा ३४-३३ असा निसटता पराभव करीत शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या महिला गटात विजयाचे सातत्य राखले. यास्पर्धेत सहभागी झाल्यापासून त्याने जेतेपद आपल्या हातून निसटू दिले नाही. या विजय बरोबरच त्यांनी “स्व. मोहन नाईक चषक” व रोख रू.पंधरा हजार(₹१५,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या शिरोडकरला चषक व रोख रू. दहा हजार(₹१०,०००/-) वर समाधान मानावे लागले.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनशिवशक्तीच्या समृद्धी भगतला रोख रू.पाच हजार(₹५,०००/-) देऊन गौरविण्यात आले. यंदा त्यांना विजेतेपदाची संधी होती. पण ती शिरोडकरने गमावली. शिवशक्तीचे प्रमुख खेळाडू राष्ट्रीय खेळ स्पर्धेकरीत महाराष्ट्र संघात निवडले गेले आहेत. शिवशक्तीच्या रुणालि भुवड, रिया मडकईकर यांनी आक्रमक सुरुवात करीत पहिल्या सत्रात २लोण दिले आणि २४-१० अशी आघाडी घेतली. क्रीडारसिकांना वाटले सामना एकतर्फी होणार. पण दुसऱ्या सत्रात शिरोडकरच्या मेघा कदम, धनश्री पोटले यांनी झंझावाती चढाया करीत संघाला सामन्यात पुन्हा आणले. त्यांना कशिस पाटीलने उत्तम पकडी करीत छान साथ दिली. पण त्यांच्या विरोधात दिला गेलेला तांत्रिक गुण त्यांना पराभवाच्या गर्तेत घेऊन गेला. शिवशक्तीची नेहा गुप्ता स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीची, तर शिरोडकरची मेघा कदम उत्कृष्ट चढाईची खेळाडू ठरली. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रू.दोन हजार पाचशे(₹२,५००/-) देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई पोस्टलने प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात यंदाच्या मोसमाची सुरुवात विजेतेपदाने केली. पोस्टलच्या सौरभ कुलकर्णीने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे रोख रू.पाच हजार(₹ ५,०००/-)चे पारितोषिक पटकाविले. पोस्टलने हिंदुजा रुग्णालय संघाचा प्रतिकार ४०-३० असा मोडून काढत “स्व. मोहन नाईक चषक” व रोख रू. पंधरा हजार(₹१५,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. पूर्वार्धात १९-१७ अशी आघाडी घेणाऱ्या पोस्टलने उत्तरार्धात तोच जोश कायम ठेवत या विजयाला गवसणी घातली. सौरभ कुलकर्णी, अभिषेक भोजने यांच्या आक्रमक चढाया, त्यांना जितेश सापते, अजिंक्य पवार यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. हिंदुजाच्या अनिकेत मिटके,
शुभम चौगुले, सर्वेश पांचाळ यांनी संघाला विजयी करण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली. पण ते अपयशी ठरले. पोस्टलचा तेजस कदम स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे, तर हिंदुजा संघाच्या अनिकेत मिटकेला उत्कृष्ट चढाईचा खेळाडू म्हणून रोख रू.दोन हजार पाचशे(₹२,५००/-)देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका सुयोगी नाईक,स्पर्धा निरीक्षक दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
शाहीनने पुढच्याच षटकात घेतला बदला! चौकारांची रांग लावणारा क्विंटन डी कॉक तंबूत
चेपॉकवर पाकिस्तान सर्वबाद, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांची आवश्यकता