भारताची युवा महिला सलामीवीर शफाली वर्मा (Shafali Verma) आयसीसीच्या फलंदाजांच्या महिला टी२० क्रमवारीत (ICC Rankings) पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला मागे टाकून तिने हे स्थान पुन्हा मिळवले. शफाली वर्मा याआधीही टी२० क्रमवारीत पहिल्या स्थानी राहिली आहे. भारताच्या स्मृती मंधाना हिला क्रमवारीत नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. ती एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी आता दुसऱ्या तर मेग लेनिंग तिसऱ्या क्रमांकाची टी२० फलंदाज आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली सहाव्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडच्या दोन खेळाडू पहिल्या दहामध्ये आहेत. सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्स अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. (Shafali Verma Regain T20 Battars Top Spot)
श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूने राष्ट्रकुल खेळांच्या पात्रता फेरीत ५५.२५ च्या सरासरीने २२१ धावा केल्या होत्या. त्यामुळे सहा स्थानांनी प्रगती करून ती आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. इंग्लंडची डॅनीयला वॅट तीन स्थानांनी पुढे येत तेराव्या स्थानावर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅकग्राने २९ स्थानांची झेप घेत २८ व्या स्थानावर कब्जा केला आहे. तीने ऍडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध ४९ चेंडूत नाबाद ९१ धावांची खेळी केली होती.
गोलंदाजी क्रमवारीत अव्वल तीन खेळाडूंमध्ये कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडची सोफी एक्कलस्टोन अव्वल तर सारा ग्लेन दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या दीप्ती शर्माने (Dipti Sharma) ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूटला मागे सोडत चौथे स्थान काबीज केले.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही फारसा बदल झालेला नाही. सोफी डिव्हाईन आणि नताली सिव्हर यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम राखले आहे. दीप्ती शर्मा एका स्थानाने प्रगती करत तिसर्या क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानची निदा दार आणि थायलंडची नटाया बौचेथम यांनीही दोन स्थानांनी प्रगती करत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी चार स्थानांनी घसरून पहिल्या दहामधून बाहेर पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती (mahasports.in)