सध्या क्रिकेट जगतात अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटू आपला सर्वकालीन खेळाडूंचा संघ निवडत आहेत. यातच आता बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने देखील त्याचा सर्वकालीन एकदिवसीय संघ निवडला आहे. ज्यामध्ये त्याने ३ भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या संघाचा कर्णधार त्याने महेंद्रसिंग धोनीला निवडले आहे.
शाकिबच्या या संघात त्याने सलामीचे फलंदाज म्हणून भारताचा ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला निवडले आहे, तर दुसरा सलामीचा फलंदाज म्हणून पाकिस्तानच्या सईद अन्वरला देखील निवडले आहे.
सचिनने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. आजही सर्वाधिक धावा बनण्याचा विक्रम सचिनच्याच नावे आहे. तर पाकिस्तानचा सईद अन्वर हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. तसेच शाकिबने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला देखील संघात सामील केले आहे. तर भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली देखील शाकिबच्या अंतिम ११ मध्ये आहे.
गेल हा सलामीचा फलंदाज असला तरी, त्याच्या आक्रमक खेळीमुळे कोणताही सामना जिंकण्याच्या क्षमतेमुळे शाकिबने त्याला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. तर चौथ्या क्रमांकावर सर्वात उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीला ठेवले आहे. विराटने देखील अनेक विक्रम आपल्या नावे केले आहे.
तसेच शाकिबने या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसला स्थान दिले आहे. कॅलिस त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूपैकी एक होता. तर सहाव्या क्रमांकावर शाकिबने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यष्टीरक्षक म्हणून निवडले आहे. एवढेच नाही, तर शाकिबने त्याच्या संघाचा कर्णधार म्हणून देखील धोनीला निवडले आहे.
स्पोर्ट्सकिडाच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना शाकिबने या संघात स्वतःला सातव्या क्रमांकावर ठेवले आहे. शाकिब हा बांगलादेशचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने बांगलादेशच्या विजयात अनेक वेळा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच तो सध्याचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूपैकी एक असा खेळाडू आहे. त्यानंतर शाकिबने फिरकी गोलंदाजीची धुरा श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्नला सोपवली आहे.
तर शेवटच्या दोन स्थानात त्याने वेगवान गोलंदाज म्हणून पाकिस्तानच्या वसीम अक्रमला आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राला संधी दिली आहे. अक्रम त्याच्या काळात त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, तर मॅकग्रा त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जायचा.
शाकिब अल हसनचा सर्वकालीन एकदिवसीय संघ
सचिन तेंडुलकर, सईद अन्वर, क्रिस गेल, विराट कोहली, जॅक कॅलिस, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा,
महत्वाच्या बातम्या –
–रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलच्या गावात गावकऱ्यांनी गरबा खेळून ऐतिहासिक विजय केला साजरा
–जिद्दीला सलाम! ८ व्या वर्षी गमावला हात, स्पर्धेपूर्वी कोरोनाची लागण, तरीही भारतासाठी मिळवले ‘रौप्य’ पदक
–फिंचची ८ वर्षांपूर्वीची तुफानी फटकेबाजी; २५ चेंडूत १२८ धावा वसूल करत इंग्लिश गोलंदाजांचा काढला होता घाम