“स्व:ता कठोर मेहनत घेतल्याशिवाय त्याचे फळ मिळत नाही.”असे उदगार प्रो-कबड्डी खेळाडू अजिंक्य कापरे यांनी शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालय येथे आयोजित “कबड्डी दिनाच्यानिमित्ताने” घेतलेल्या मुलाखतीत काढले आहेत.
शारदाश्रम तांत्रिक विद्यालय गेली ३वर्ष ओम कबड्डी प्रबोधिनीच्या माध्यमातून मुलांना कबड्डी खेळाचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवित आहे. महाराष्ट्र कबड्डी दिन आणि गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून यंदा “गुरू शिष्याच्या” मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यानिमिताने शिष्य म्हणून अजिंक्य कापरे बोलत होता की शेट्टी सरांच्या प्रेरणेने मी आज कबड्डी खेळाडू म्हणून येथे आहे. ओम कबड्डी प्रबोधिनीचाही मला घडविण्यात मोलाचा वाटा आहे.
एल्फिस्टन येथील कामगार क्रीडा भवन येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात सलग तीन वर्षे कबड्डीचे शिक्षण घेतल्यामुळे मला फिटनेसचे महत्व कळले. मोठ्या खेळाडूंच्या खेळाचे निरीक्षण करीत मी माझ्या खेळात सुधारणा केली. त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की, स्व:ता कठोर मेहनत घ्या आणि खेळाशी प्रामाणिक रहा.
गुरू म्हणून सुहास जोशीना विचारले असता, ते म्हणाले की, कबड्डी हा पाय खेचण्याचा खेळ असला तरी हातात हात घेऊन खेळायचा खेळ देखील आहे. खेळाडूने प्रथम चांगला माणूस व्हावंयास हवे. तुम्ही चांगले माणूस असाल तर खेळानंतरही लोक तुमचा आदर करतील. ते पुढे असेही म्हणाले, की गुरुजन जे सांगतात ते कसोशीने पाळा. माझे वडील डॉक्टर असताना देखील, माझ्या गुरूमुळेच मी आज शिक्षक म्हणून येथे उभा आहे.
शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयाच्या विद्यमाने आणि ओम कबड्डी प्रबोधिनीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात माया मेहेर, जीवन पैलकर, वैशाली सावंत, दीपक राणे, राजू कवळे, शशिकांत राऊत यांनी मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मंगेश कोचरेकर यांनी केले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कबड्डी या खेळाकडे आपल्या जीवनाचा उत्कर्ष करण्याची संधी म्हणून पहा. उपस्थितांचे आभार विभावरी दामले यांनी मानले. या कार्यक्रमास फिरोज पठाण, सीताराम साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.