भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणारी चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ऍशेस मालिकेइतकीच प्रतिष्ठा या मालिकेला सध्या मिळते आहे. मात्र, मालिकेआधी यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत भर पडली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर मालिकेतील पहिल्या कसोटीतून बाहेर गेला आहे. त्यामुळे, ज्यो बर्न्ससह आता दुसरा सलामीवीर कोण असेल ? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. आता माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी या परिस्थितीवर ऑस्ट्रेलियन संघाला तोडगा सुचवला आहे.
वॉर्नर झाला होता जखमी
वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे, तो टी२० मालिकेतून बाहेर पडला होता. वॉर्नर अजूनही दुखापतीतून पूर्णतः सावरला नसल्याने, ऍडलेड येथील पहिल्या दिवस-रात्र कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन काहीसे चिंतीत आहे.
मार्श घेऊ शकतो वॉर्नरची जागा
ऑस्ट्रेलियन संघाच्या या चिंतेवर माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी तोडगा सुचवलेला दिसून येतोय. बॉर्डर यांनी वॉर्नरची जागा घेणाऱ्या खेळाडूचे नाव सांगताना म्हटले, “मार्नस लॅब्युशेन व मार्कस हॅरिस हे पहिल्या कसोटीत सलामीसाठी उत्तम पर्याय आहेत. मात्र, मला विचाराल तर मी सलामीवीर म्हणून अनुभवी शॉन मार्शचे नाव सुचवेल. लॅब्युशेन नवा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. परंतु मार्शकडे भरपूर अनुभव आहे आणि हा अनुभव सलामीवीरासाठी आवश्यक असतो.”
मार्शने ऑक्टोबर महिन्यापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना सहा सामन्यात तीन शतके व एक अर्धशतक झळकावले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांकडे आहे अनुभवाची कमतरता
वॉर्नर जखमी झाल्यामुळे कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जो बर्न्स व युवा विल पुकोवस्की पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सलामी देण्यासाठी सज्ज होते. मात्र, भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात कार्तिक त्यागीचा चेंडू पुकोवस्कीच्या हेल्मेटवर आदळल्याने, त्याला कन्कशनचा त्रास झाला. आयसीसीच्या कन्कशन प्रोटोकॉलनुसार, पुकोवस्की पहिल्या सामन्यात खेळणे संदिग्ध मानले जातेय. दुसरीकडे, बर्न्स मागील काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे.
संबंधित बातम्या:
– ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का; डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीतून बाहेर; हा खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता
– हा खेळाडू भारताच्या कसोटी संघात असायलाच हवा, माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नचे मत
– पंतला कसोटी संघात स्थान मिळणे अवघड; या माजी खेळाडूने वर्तविली शक्यता