कोलंबो। रविवारपासून (१८ जुलै) श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. आर प्रमदासा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडेत श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २६३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा प्रभारी कर्णधार शिखर धवनने वैयक्तिक २३ वी धाव घेताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
शिखरने विव रिचर्ड्स, गांगुलीसारख्या दिग्गजांना टाकले मागे
रविवारी शिखरने २३ वी धाव घेताच वनडे कारकिर्दीत ६००० धावा पूर्ण केल्या. त्याने कारकिर्दीतील १४३ वनडे सामन्यांतील १४० व्या डावात खेळताना हा महत्त्वाचा टप्पा गाठला. त्यामुळे तो ६००० वनडे धावांचा टप्पा गाठणारा १० भारतीय क्रिकेटपटू ठरला.
याशिवाय तो सर्वात जलद ६००० वनडे धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सध्या वनडेत सर्वात जलद ६००० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली (१३६ डाव) अव्वल क्रमांकावर आहे. तर गांगुली आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. गांगुलीला ६००० वनडे धावा करण्यासाठी १४७ डाव लागले होते.
तसेच जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० वनडे धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये शिखरने चौथा क्रमांक मिळवला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर हाशिम अमला (१२३ डाव), दुसऱ्या क्रमांकावर विराट (१३६ डाव) आणि तिसऱ्या क्रमांकावर केन विलियम्सन (१३९ डाव) आहेत. या यादीत चौथा क्रमांक मिळवताना शिखरने सर विव रिचर्ड्स आणि जो रुटला मागे टाकले आहे. विव रिचर्ड्स आण जो रुटला ६००० वनडे धावा करण्यासाठी प्रत्येकी १४१ डाव लागले होते.
वनडेत सर्वात जलद ६००० धावा करणारे क्रिकेटपटू –
१२३ डाव – हाशिम अमला
१३६ डाव – विराट कोहली
१३९ डाव – केन विलियम्सन
१४० डाव – शिखर धवन
१४१ डाव – विव रिचर्ड्स
१४१ डाव – जो रुट
१४७ डाव – सौरव गांगुली
१४७ डाव – एबी डिविलियर्स
श्रीलंकेविरुद्ध १००० धावा
शिखरने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात १७ वी धाव घेताच त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो भारताचा १२ वा खेळाडू ठरला. तसेच, तो श्रीलंकेविरुद्ध सर्वात जलद १००० वनडे धावा करणाराही खेळाडू ठरला. त्याने श्रीलंकेविरुद्ध १७ व्या डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. शिखरने हा विक्रम करताना अमलाला मागे टाकले आहे. अमलाने १८ डावात श्रीलंकेविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कृणाल पंड्याने मारली असलंकाला मिठी, दिले खिलाडूवृत्तीचे दर्शन, व्हिडिओ झाला व्हायरल
टाॅस झाला अन् सुर्याकुमारने चाळीस वर्षापुर्वी मुंबईकरानेच केलेल्या विक्रमाची केली बरोबरी