इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड झाली असून सर्व प्रमुख खेळाडूंना या संघात स्थान दिले गेले आहे.
वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळताना दिसेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघात खासकरून युवा खेळाडूंचा समावेश असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, या दौऱ्यासाठी कर्णधार कोण असणार याविषयी अजूनही उलगडा झाला नाही. सध्या निवडसमितीसमोर शिखर धवन, श्रेयस अय्यर व भुवनेश्वर कुमार हे कर्णधारपदासाठी संभाव्य उमेदवार आहेत. त्याचवेळी, युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने या तिघांपैकी कोण संघाचे नेतृत्व करू शकतो, याविषयी मत मांडले.
हा असावा कर्णधार
श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज दीपक चाहर याची निवड होणे पक्के आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या संघाचा कर्णधार कोण असावा? याविषयी दीपकने आपले मत मांडले. तो म्हणाला, “शिखर भाई कर्णधार म्हणून चांगला पर्याय असेल. तो अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असून त्याचा अनुभव दांडगा आहे. माझ्या मते एका वरिष्ठ खेळाडूकडे नेतृत्व देण्यात यावे. सर्व खेळाडू त्यांचा आदर करतात व त्यांच्या गोष्टी ऐकतात. माझ्यासाठी तरी तो कर्णधार म्हणून योग्य व्यक्ती आहे.”
आयपीएलमध्ये केली दिमाखदार कामगिरी
अचानकपणे स्थगित झालेल्या आयपीएलमध्ये शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. स्पर्धा थांबेपर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना त्याने ८ सामन्यात ५४ च्या दमदार सरासरीने, ३ अर्धशतकासह ३८० धावा ठोकल्या आहेत. ऑरेंज कॅप देखील त्याच्याच डोक्याची शोभा वाढवतेय. धवनने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे तर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपर किंग्ज याच दिवशी ४ वर्षांपुर्वी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या खूप मागे पडली
जेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूचे वनडे द्विशतकाचे स्वप्न भंगले होते सचिन तेंडूलकरमुळे
हे भारी आहे! नितीश राणाला पाठीवर उचलून पत्नी साची करतेय वर्कआऊट, पाहा व्हिडिओ






