वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने पहिल्या वनडेत चमकदार कामगिरी करून दाखवली. संघाचा कर्णधार शिखर धवन याने या सामन्यात धमाकेदार खेळी केली. त्याने सलामीला उतरत अप्रतिम अर्धशतक ठोकले. त्याने आपल्या या खेळी दरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली.
शिखरची धमाकेदार खेळी
प्रभारी कर्णधार म्हणून कार्यभार वाहत असलेल्या शिखरने सलामीला उतरत या सामन्यात संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्याने शुबमन गिलसह ११९ धावांची धावांची सलामी दिली. स्वतः शिखरने जबाबदारी घेत ९९ चेंडूवर १० चौकार व २ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली. परंतु, आपल्या वनडे कारकिर्दीतील १८ वे शतक झळकावण्यात त्याला अपयश आले.
नव्या विक्रमांवर कोरले नाव
आपल्या १५० व्या वनडे डावात त्याने ही खेळी करत असताना बरेच विक्रम नोंदवले. पहिल्या १५० डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आला. त्याच्या नावे आता ६४२२ धावा जमा झाल्या आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानी विराट कोहली असून त्याने ६५६८ धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विचार केला तर हाशिम आमला व विराटनंतर त्याचाच क्रमांक लागतो. आमलाने आपल्या पहिल्या १५० वनडे डावात ७०३२ धावा काढलेल्या.
नर्व्हस नाईंटीजचाही शिकार
इतर चांगल्या विक्रमांसह शिखर सातव्यांदा नव्वदीत बाद झाला आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त वेळा नव्वदीत बाद होणारे खेळाडू अनुक्रमे सचिन तेंडुलकर (१८ वेळा), अरविंद डिसिल्वा, ग्रॅंट फ्लॉवर व नॅथन ऍस्टल ( प्रत्येकी ९ वेळा) आणि जॅक कॅलिस (८ वेळा) हे आहेत. भारताकडून शिखरनंतर माजी कर्णधार सौरव गांगुली (६ वेळा) याचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
धवन-गिलची झक्कास कामगिरी! दोघांनीही मागे सोडला ‘विक्रमादित्य सचिन’
‘शार्दुल ठाकुरकडे हार्दिक पंड्याएवढी क्षमता नाहीये…’, माजी दिग्गजाची प्रतिक्रिया चर्चेत
किती हे क्रिकेट? टी२० विश्वचषकाआधी टीम इंडिया खेळणार दोन नव्या मालिका; असा आहे कार्यक्रम