कोलंबो। रविवारी (१८ जुलै) श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील पहिला सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. भारताच्या या विजयात प्रभारी कर्णधार शिखर धवनने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात शिखरला शतकी खेळी करण्याची संधी होती, पण त्याने संयमी खेळ करण्यावर भर दिला. याबद्दल आता शिखरनेच आपले मत व्यक्त केले आहे.
कर्णधार म्हणून पहिलाच वनडे सामना खेळताना शिखरने श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८६ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त पृथ्वी शॉने २४ चेंडूत ४३ आणि इशान किशनने ४२ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमारने २० चेंडून नाबाद ३१ धावा केल्या. त्यामुळे भारताने ३७ व्या षटकातच विजय मिळवला.
या सामन्यानंतर तो म्हणाला, ‘आमच्या संघातील सर्व खेळाडू बरेच परिपक्व आहेत. ते ज्याप्रकारे खेळले, त्यामुळे मी खूप खूष आहे. मला माहित होते की खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी चांगली होती. आमच्या फिरकी गोलंदाजांनी १० व्या षटरापर्यंत ज्याप्रकारे गोलंदाजी केली, त्यामुळे आम्हाला आघाडी मिळवणे शक्य झाले. आमच्या तिन्ही फिरकीपटूंनी चांगले प्रदर्शन केले.’
शिखर फलंदाजीबद्दल म्हणाला, ‘आम्ही जेव्हा फलंदाजीला उतरलो, तेव्हा दुसऱ्या बाजूने अन्य फलंदाजांची फलंजाडी बघणे आनंदायी होते. युवा खेळाडू ज्याप्रकारे आयपीएल खेळतात, त्यांना ज्याप्रकारे संधी मिळते, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पृथ्वी आणि इशानने ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे जवळपास १५ षटकातच त्यांनी सामना आमच्या बाजूने वळवला होता.’
त्याचबरोबर स्वत:च्या खेळीबद्दल शिखर म्हणाला, ‘मी शतकाबद्दल विचार केला होता, पण तेव्हा अधिक धावा शिल्लक नव्हत्या. त्यामुळे मी नाबाद खेळी करण्यावर लक्ष केंद्रित केले. जेव्हा सूर्यकुमारनी येऊन फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा ते अधिक सुकर वाटले. मला वाटले की मलाच माझ्या कौशल्यावर अधिक काम करावे लागेल.’
भारतीय फिरकी गोलंदाज चमकले
श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६२ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून चमिका करुणारत्नेने १ चौकार आणि २ षटकारांसह ३५ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या. तसेच चरिथ असलंकाने ३८ आणि कर्णधार दसून शनकाने ३९ धावांची खेळी केली. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही
पहिल्या वनडेतील विजयासह सुपर लीग गुणतालिकेत भारताची भरारी, ‘या’ स्थानी घेतली झेप