भारताने न्यूझीलंडविरुद्ध चौथा टी20 सामना 50 धावांनी गमावला असला, तरी या पराभवातही एक उजळलेला तारा ठरला तो म्हणजे शिवम दुबे. पहिल्या तीन सामन्यांतील भारताच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हा पराभव धक्कादायक ठरला. मात्र दुबेच्या झंझावाती फलंदाजीमुळे पराभवाचं अंतर आणखी वाढण्यापासून वाचलं. अन्यथा भारताचा मोठा पराभव झाला असता.
या सामन्यात शिवम दुबेने अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत मैदानात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यानंतर त्याला ‘दानव’ अशी उपाधी मिळाली. दुबेची ही आक्रमक खेळी पाहून राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर एक मिश्किल पोस्ट शेअर करत, “नवा सामना, नवा दानव!” अशी प्रतिक्रिया दिली. ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली.
दुबेचा हा आक्रमक अवतार अचानक आलेला नाही. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे. चौथा टी20 सामना संपल्यानंतर दुबेने स्वतः याबाबत खुलासा केला. सलग सामने खेळण्याची संधी आणि गोलंदाजी केल्यामुळे आपलं मनोबळ प्रचंड वाढल्याचं त्याने सांगितलं.
“ही माझ्या कठोर परिश्रमांची फळं आहेत. सलग सामने खेळल्यामुळे आणि विविध परिस्थितीत फलंदाजी केल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. आता मला कळतं की समोरचा गोलंदाज काय विचार करू शकतो आणि माझ्याविरुद्ध काय योजना आखू शकतो,” असे दुबे म्हणाला.
दुबेने आपल्या गोलंदाजीचाही उल्लेख करत, गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे विशेष आभार मानले. “गोलंदाजीची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, तेव्हा खेळाची समज अधिक प्रगल्भ होते. त्यामुळेच माझ्या फलंदाजीतही सुधारणा झाली आहे,” असे तो म्हणाला.
या सामन्यात दुबेने 23 चेंडूंमध्ये 65 धावा करताना 7 षटकार ठोकले. या खेळीबाबत बोलताना तो म्हणाला की, अनुभव हीच खरी शिदोरी आहे. “तुम्ही आधी जसे होता तसे कायम राहू शकत नाही. कारण विरोधक सतत अधिक सक्षम होत जातात. त्यामुळे स्वतःच्या खेळात सातत्याने सुधारणा करणं गरजेचं आहे,” असे दुबेने स्पष्ट केले.






